रायपूर येथील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या साखळी सामन्यात काल इंडिया लिजेंड्सने दक्षिण आफ्रिका लिजेंड्सवर ५६ धावांनी मात केली. या सामन्यात इंडिया लिजेंड्सचा अष्टपैलू युवराज सिंगने सलग चार षटकार ठोकत चाहत्यांना, आपण पूर्वी मारलेल्या सलग सहा षटकारांची आठवण करून दिली. मात्र, पाचवा षटकार का मारला नाही, याचा खुलासा स्वतः युवराजने केला.
युवराजचा धमाका
दक्षिण आफ्रिका लिजेंड्सविरूद्ध या सामन्यात युवराजने धमाकेदार खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने अवघ्या २२ चेंडूत २ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५५ धावांची खेळी केली. डावाच्या १८ व्या षटकात युवराजने डी ब्रुएनच्या सलग चार चेंडूवर चार षटकार लगावले. युवराजने यापूर्वी २००७ टी२० विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार ठोकले होते.
म्हणून नाही मारला पाचवा षटकार
सामन्यानंतर युवराज सिंगने सलग पाचव्या चेंडूवर षटकार का मारला नाही हे सांगितले. तो म्हणाला, “सलग चार षटकार मारल्यानंतर मी पाचव्या षटकाराचा विचार करत होतो. मला वाटले की, गोलंदाजाने माझ्या क्षेत्रात चेंडू टाकला तर मी तो मारण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, नंतर मला आठवले की, शेवटची दोन षटके बाकी आहेत. म्हणून मी शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक घेण्याचा निर्णय घेतला. डाव संपेपर्यंत मला फलंदाजी करायची होती.”
इंडिया लिजेंड्सचा मोठा विजय
प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेंड्सने कर्णधार सचिन तेंडुलकर व युवराज सिंग यांच्या अर्धशतकाच्या तसेच, बद्रीनाथ व युसुफ पठाण यांच्या योगदानाच्या जोरावर २०४ धावा धावफलकावर लावल्या.
प्रत्युत्तरात, अँड्र्यू पुटीक व मॉर्नी वॅन विक यांच्या भागीदारीच्या जोरावर चांगली सुरुवात केली. मात्र युसुफ पठाण व युवराज सिंग यांनी गोलंदाजीतही कमाल करताना साऊथ आफ्रिका लिजेंड्सचा डाव १४८ धावांपर्यंत मर्यादित ठेवला. युवराज सिंगला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
विजय हजारे ट्रॉफी २०२१: यंदा अनेक नव्या विक्रमांचा नांदी, वाचा खास आकडेवारी
‘भूवी’ के वार से बचना नामुमकीन! विकेट वाचवण्याचा बटलरचा प्रयत्न व्यर्थ, ‘असा’ झाला शून्यावर पायचित
मुर्ती लहान पण किर्ती महान! इशान किशन करतोय भारताकडून पदार्पण, वाचा त्याच्या प्रवासाची रोमांचक कहाणी