भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगला क्रिकेटच्या मैदानावर षटकार किंग या नावाने ओळखले जाते. त्याला ही ओळख टी२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारल्यानंतर मिळाली होती. याबद्दल युवराजने खुलासा केला की, इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफच्या धमकीनंतर त्याने पुढच्या षटकात ६ षटकार ठोकले होते.
याबद्दल युवराज (Yuvraj Singh) म्हणाला की, “माझा ६ षटकार मारण्याचा विचार नव्हता. परंतु फ्लिंटॉफबरोबर झालेल्या शाब्दिक वादामुळे मला राग आला होता. मी फ्लिंटॉफच्या षटकात २ चौकार मारले होते. ते त्याला आवडले नाहीत. षटक संपल्यानंतर त्याने त्या चौकारांना खराब म्हटले. तो इतके बोलून थांबला नाही तर त्याने पुढे म्हटले की, तो माझा गळा कापेल.”
“फ्लिंटॉफच्या (Andrew Flintoff) या धमकीनंतर मी त्याला म्हटले की हे बघ माझ्या हातात ही बॅट आहे. तुला माहिती आहे मी या बॅटने तुला कुठे मारू शकतो. यानंतर पंचांनी मध्यस्थी केली होती. तेव्हाच मी ठरवले की, आता पुढच्या षटकातील प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या (बाऊंड्री) पलीकडे पाठवायचा आहे. त्यादिवशी माझे नशीब चांगले होते. त्यामुळेच मी स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) गोलंदाजीवर ६ षटकार मारण्याचा कारनामा करू शकलो,” असेही ६ षटकारांबद्दल बोलताना युवराज म्हणाला.
इंग्लंडविरुद्ध २००७मध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात युवराजने १९व्या षटकातील सर्व चेंडूंवर षटकार ठोकले होते. त्यावेळी तो हर्षल गिब्सनंतरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारणारा दुसराच फलंदाज ठरला होता.
युवराज पुढे म्हणाला की, “मला माहिती नाही की मी पहिला षटकार कसा मारला. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर मी चांगले षटकार ठोकले.”
या सामन्यात युवराजने केवळ १२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. जे टी२०तील सर्वात जलद अर्धशतक आहे. युवराजच्या अर्धशतकांच्या मदतीने भारताने इंग्लंडसमोर २१८ धावांचे आव्हान ठेवले होते. परंतु भारताने इंग्लंडला या सामन्यात १८ धावांनी पराभूत केले होते. या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही युवराजला देण्यात आला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-केदार म्हणतो, या दोन दिग्गजांमुळे बदलली माझी गोलंदाजीची शैली
-गरीब मुलांच्या मदतीला धावुन आला केएल राहुल, करणार ही मदत
-पुणे वाॅरियर्स व रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळलेले ३ खेळाडू