---Advertisement---

युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर; पाँटिंग, वॉर्नसह ‘या’ सामन्यात खेळताना दिसणार…

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी 8 फेब्रुवारी रोजी बुशफायर क्रिकेट बॅशमध्ये एक चॅरिटी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना वॉर्न एकादश विरुद्ध पाँटिंग एकादश संघात खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आणि पाकिस्तानचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वासिम आक्रम हे देखील सहभागी होणार आहेत. युवराजने मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने 2011 चा वनडे विश्वचषक भारताला मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलाल होता.

त्याचबरोबर आक्रम यांनी पाकिस्तानच्या अनेक विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 916 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यांची पत्नी शानिएरा थॉम्पसन ऑस्ट्रेलियन आहे.

याबरोबरच या चॅरीटी सामन्यासाठी वॉर्न एकादश संघाचा कर्णधार महान गोलंदाज शेन वॉर्न असेल तर पाँटिंग एकादशचा कर्णधार रिकी पाँटिंग असणार आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर पाँटिंग एकादश संघाचा प्रशिक्षक असणार आहे. तर वेस्ट इंडिजचे अनुभवी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श वॉर्न एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत.

हा चॅरिटी सामना 8 फेब्रुवारीला बीग बॅश लीग 2019-20 च्या अंतिम सामन्याआधी खेळवला जाईल. मात्र अजून हा सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवला जाणार याचा निर्णय व्हायचा आहे.

या सामन्यासाठी युवराज, आक्रम व्यतिरिक्त ब्रेट ली, ऍडम गिलख्रिस्ट, शेन वॉटसन, मायकल क्लार्क, जस्टिन लँगर, ऍलेक्स ब्लॅकवेल, एलिसा विलानी, ग्रेस हॅरिस, फोएब लिचफिल्ड असे दिग्गज खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. तसेच रग्बीपटू ब्रॅड फिटर, ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉलपटू ल्यूक हॉज हे देखील या सामन्यासाठी सहभागी होणार आहेत.

तसेच या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी कर्णधार स्टिव्ह वॉ आणि मेल जोन्स नॉन प्लेइंग स्टाफचा भाग असतील. या सामन्यात होणारी सर्व कमाई ऑस्ट्रेलियन रेड क्रॉस डिझॅस्टर रिलिफ अँड रिकव्हरी फंडला दिली जाईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---