भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलसाठी मागचे काही महिने खूपच निराशाजनक ठरले आहेत. चहलला मागच्या महिन्यात पार पडलेल्या आयसीसी टी२० विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यापूर्वी त्याने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चांगले प्रदर्शन केले होते. असे असले तरी, त्याची आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनेदेखील त्याला पुढच्या वर्षीसाठी रिटेन केले नाही. चहल सध्या या सर्व गोष्टीन विसरून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चहल हरियाणा संघासाठी खेळतो. त्याने एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, “मला विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन करायचे आहे आणि मी हरियाणाला जेतेपद जिंकवण्यात मदत करू इच्छितो. मी नेट्समध्ये चांगली गोलंदाजी करत आहे आणि माझ्या गोलंदाजीचा चांगला आनंद घेत आहे. मेहनतीला काहीच पर्याय नाही. जी गोष्ट गेली ती गेली. एक वर्षाच्या अंतरानंतर यावेळी रणजी ट्रॉफीचे आयोजन होत आहे. मी या संधीचा फायदा घेऊ इच्छितो.”
यावेळी चहलने त्याला टी-२० विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नसल्यामुळे पुन्हा एकदा खंत व्यक्त केली. त्याच्या कुटुंबाच्या सहकार्याने तो या निराशेतून बाहेर आल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, “विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी संघात स्थान न बनवणे निराशाजनक होते. मला वाटते की, मी आयपीएलमध्ये आणि श्रीलंकेविरुद्ध मालिकेत चांगले प्रदर्शन केले होतो. मात्र, हा एका खेळाडूच्या आयुष्याचा भाग आहे. जेव्हा याला निवडले गेले नाही, तेव्हा मी विश्वचषकावर नजर लावून बसलो होतो. तरीदेखील या निराशेला दुर करण्यासाठी मला माझ्या परिवाराकडून खूप सहकार्य मिळाले. न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये राहणे चांगले होते.”
“मी विराट भैयाच्या नेतृत्वाच चांगले प्रदर्शन केले आहे. मला आशा आहे की, टी२० प्रकारात रोहित भैयाच्या कर्णधारपदामध्ये देखील चांगले प्रदर्शन करील. मी भारत अ संघात असताना द्रविड सरांच्या प्रशिक्षणात खेळलो आहे. ते एक हुशार आणि महान प्रशिक्षक आहेत. सोबतच आता पारस म्हांब्रेदेखील गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. मी त्यांच्याशी माझ्या गोलंदाजीविषयी चर्चा केलेली. त्यांच्या सल्ल्यामुळे मला निश्चित स्वरूपात फायदा मिळाला असेल,” असेही चहल पुढे बोलताना म्हणाला.