लखनऊ। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील (T20I Series) पहिला सामना पार पडला. भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम येथे पार पडलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ६२ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. याबरोबरच याच सामन्याच भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने एका मोठा विक्रमालाही गवसणी घातली.
चहलने टाकले बुमराहला मागे
गुरुवारी झालेल्या सामन्यात चहलने गोलंदाजी करताना ३ षटकांत केवळ ११ धावा देत १ विकेट घेतली. त्याने श्रीलंकेचा कर्णधाक दसून शनकाला ३ धावांवर भुवनेश्वर कुमारच्या हातून झेलबाद केले. चहलसाठी ही विकेट विक्रमी ठरली. कारण ही विकेट घेताच तो भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० मधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. हा विक्रम करताना त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मागे टाकले आहे.
चहलच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५३ सामन्यांत ६७ विकेट्स झाल्या आहेत. तसेच भारताकडून सर्वाधिक टी२० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. बुमराहच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५६ सामन्यांत ६६ विकेट्स आहेत.
गुरुवारी बुमराह आणि चहल या दोघांमध्येही या विक्रमासाठी चुरस होती. कारण या सामन्यापूर्वी दोघेही संयुक्तरित्या ६६ विकेट्ससह अव्वलस्थानी होते. मात्र, गुरुवारी चहलने एक विकेट घेतली आणि बुमराहला त्याने मागे टाकले. बुमराहला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. भारताकडून सर्वाधिक टी२० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल आणि बुमराहपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर ६१ विकेट्ससह आर अश्विन आहे.
चहलने केवळ बुमराहलाच नाही तर अजंता मेंडिस, मिशेल सँटेनर आणि नुवान कुलशेखरा या तीन गोलंदाजांनाही मागे टाकले आहे. या तिघांनीही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ६६ विकेट्स घेतल्या आहेत. चहल आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये १७ व्या क्रमांकावर आला आहे. तर मेंडिस, सँटेनर, कुलशेखरा आणि बुमराह संयुक्तरित्या १८ व्या क्रमांकावर आहेत (Most T20I Wickets for India).
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन आहे. त्याने ११७ विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
६७ विकेट्स – युजवेंद्र चहल (५३ सामने)
६६ विकेट्स – जसप्रीत बुमराह (५६ सामने)
६१ विकेट्स – आर अश्विन (५१ सामने)
५७ विकेट्स – भुवनेश्वर कुमार (५८ सामने)
४७ विकेट्स – रविंद्र जडेजा (५६ सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी२०त शानदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे कर्णधार रोहित नाराज






