विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सनंतर तिसरा संघ ठरला आहे. आरसीबीने रविवारी (३ ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या आयपीएलच्या ४८ व्या सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवले. आरसीबीला प्लेऑफ तिकीट मिळवण्यात अनुभवी लेग स्पिनर युझवेंद्र चहलची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे.
चहलने पंजाबविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात चार षटकांच्या आपल्या कोट्यात २९ धावा देऊन ३ विकेट घेतल्या, ज्यात चांगल्या लयीत असलेला फलंदाज मयंक अगरवाल, स्फोटक फलंदाज निकोलस पूरन आणि सरफराज खान यांच्या विकेट्सचा समावेश होता. आगामी टी -२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतील संघातून वगळण्यात आलेल्या चहलने या आयपीएलमध्ये आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली आहे.
युएईमध्ये आत्तापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये चहल सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची बरोबरी केली आहे. चहल आणि बुमराहच्या युएईमध्ये प्रत्येकी ३८ विकेट झाल्या आहेत. या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी चौथ्या क्रमांकावर आहे. रबाडाने यूएईमध्ये ३५ विकेट घेतल्या आहेत, तर शमीने ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
चहलने आतापर्यंत आयपीएलच्या सध्याच्या मोसमात आरसीबीसाठी १२ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या या मोसमात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो ७ व्या क्रमांकावर आहे. या यादीत चहलचा आरसीबीतील सहकारी गोलंदाज हर्षल पटेल २६ बळींसह अव्वल स्थानावर कायम आहे.
आरसीबीने १६ गुणांसह प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे. चेन्नई सुपर किंग्जचे १२ सामन्यात १८ गुण आणि दिल्ली कॅपिटल्सचे १२ सामन्यात १८ गुण आहेत. पण नेट रन रेटच्या आधारे चेन्नई रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघापेक्षा पुढे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तोंडचा घास हिरावला पावसाने, पण तरीही भारतीय महिला संघाने याबाबतीत घडवला इतिहास
दिसतोय का रे! मॅक्सीचा गगनचुंबी षटकार गेला स्टेडिअमच्या बाहेर; पाहून तुमचेही चक्रावतील डोळे
भारी ना! पराभवानंतरही मुंबईकडून सुर्यकुमार आणि नॅथन कुल्टर-नाईलचा सन्मान, पाहा व्हिडिओ