शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) भारताने न्यूझीलंडविरुद्ध जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टी२० मालिकेच्या दुसऱ्या टी२० सामन्यात ७ गड्यांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांसह गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली. भारताच्या या विजयानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याने विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ती संघासाठी सकारात्मक बाब
दुसऱ्या टी२० सामन्यानंतर जहीर खान याने विविध मुद्द्यांवर एका क्रिकेट संकेतस्थळाशी चर्चा केली. त्याने युवा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणाला,
“व्यंकटेशला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय मला सकारात्मक वाटला. पुढील विश्वचषकाच्या दृष्टीने संघाचा विचार सुरू असल्याचे दिसत आहे.”
त्याच वेळी त्याने जखमी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला संधी देण्यात यायला हवी होती, असे म्हटले. तो म्हणाला,
“हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार व दीपक चहर हे तिघेही एकाच प्रकारचे गोलंदाज आहेत. त्यामुळे आवेशला संधी द्यायला पाहिजे.”
जहीर खानने भारतीय संघाच्या विश्वचषकातील अपयशाचे कारण मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हे सांगितले.
भारताचा सलग दुसरा विजय
शुक्रवारी झालेल्या सामन्यात रोहित आणि राहुल या दोघांनी शतकी भागीदारीबरोबरच वैयक्तिक अर्धशतकेही पूर्ण केली. रोहितने ५५ धावांची खेळी केली, तर केएल राहुलने ६५ धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने १५४ धावांचे आव्हान १७.२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तसेच मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेलने प्रत्येकी ३१ धावा केल्या. भारताकडून हर्षल पटेलने सर्वाधिक २ बळी घेतले.