100 कसोटींचा आकडा गाठणं ही क्रिकेट खेळाडूच्या कारकिर्दीतील एक अतुलनीय कामगिरी मानली जाते. टीम इंडियाकडून आतापर्यंत तब्बल 313 खेळाडूंनी कसोटीत प्रतिनिधित्व केलं आहे. त्यापैकी केवळ 13 खेळाडूंनी 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेत.
आता दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) 100 कसोटी खेळणारा 14वा खेळाडू बनणार आहे. मात्र अश्विनच्या मते हा त्याच्यासाठी केवळ एक आकडा आहे. 100 कसोटी सामने खेळणं हे माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी अधिक महत्त्वाचं असल्याचं अश्विननं सांगितलं.
“माझी स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे लोकांना वाटतं की मी आकड्यांना महत्त्व देतो. परंतु प्रत्यक्षात तसं नाही. याचा माझ्यासाठी काहीही अर्थ नाही. १०० वा कसोटी सामना माझ्या आई-वडिलांसाठी आणि पत्नीसाठी खूप महत्त्वाचा आहे. खरं तर माझ्या मुली माझ्यापेक्षा जास्त उत्साहित आहेत”, असं अश्विन म्हणाला.
अश्विननं पुढे बोलताना आपली बाजू स्पष्ट केली. टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू – झहीर खान आणि महेंद्रसिंह धोनी हे 100 कसोटी सामने खेळू शकले असते, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट नव्हती, असं अश्विननं नमूद केलं. झहीर खाननं त्याच्या कारकिर्दीत एकूण 92 कसोटी सामने खेळले, तर महेंद्रसिंग धोनीनं 90 कसोटी सामने खेळून तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामनांच्या मालिकेतील शेवटचा सामना उद्या (7 मार्च) पासून धर्मशाला येथे खेळला जाणार आहे. हा सामना अश्विनसह इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टोसाठी देखील खास आहे. अश्विन प्रमाणेच त्यालाही इंग्लंडकडून 100 वी कसोटी कॅप मिळणार आहे.
भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर राहुल द्रविड (164), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावसकर (125), दिलीप वेंगसरकर (116), सौरव गांगुली (113), विराट कोहली (113)*, इशांत शर्मा (105)* वीरेंद्र सेहवाग (104), हरभजन सिंह (103) आणि चेतेश्वर पुजारा (103)* यांचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड कसोटीपूर्वी भारतीय फिरकीपटूचा मोठा निर्णय! क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला ठोकला रामराम
न्यूझीलंडच्या दिग्गजावर निवृत्तीसाठी बळजबरी! माजी कर्णधाराचा मोठा दावा
IND vs ENG । ‘सर्वात मोठे दुःख हेच की…’, धरमशाला कसोटीआधी अश्विनने व्यक्त केली खंत