अनेक क्रिकेटपटू आहेत, जे निवृत्तीनंतर आपल्या खेळाबरोबरच जोडलेले असतात. काहीजण समालोचन करतात, तर काहीजण क्रिकेट तज्ज्ञ बनतात. तसेच काही खेळाडू आपल्या संघाचे भविष्य तयार करण्यासाठी प्रशिक्षक बनतात. परंतु काही खेळाडू असेही आहेत, ज्यांचा आता या खेळाशी काहीही संबंध राहिलेला नाही.
झिंबाब्वेचा असाच एक क्रिकेटपटू आहे, त्याचे नाव आहे ट्रेव्हिस फ्रेंड (Travis Friend). तो आपल्या वेगवान गोलंदाजी आणि मधल्या फळीत चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जात होता. परंतु आता तो पायलट झाला आहे.
ट्रेव्हिस फ्रेंडची कहाणी
झिंबाब्वेचा (Zimbabwe) अष्टपैलू क्रिकेटपटू ट्रेव्हिसचा जन्म ७ जानेवारी 1981 साली मिडलँड्स येथे झाला होता. ट्रेव्हिसने ३० डिसेंबर २००० साली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. तसेच त्याने आपले कसोटी पदार्पण भारताविरुद्ध हरारे येथे १५ जून २००१मध्ये केले होते. ट्रेव्हिसने १३ कसोटी सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ४४७ धावाही केल्या होत्या. त्यात ३ अर्धशतकांचाही समावेश आहे.
त्याने ५१ वनडे सामने खेळताना ३७ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ५४८ धावाही केल्या होत्या. वनडेतही त्याने ३ अर्धशतके केली आहेत.
ट्रेव्हिस अगोदर फिरकीपटू होता. परंतु त्यानंतर तो वेगवान गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला. ट्रेव्हिसची वेगवान गोलंदाजी कमालीची होती आणि १४० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करत होता. तो खूप कमी वयात झिंबाब्वे संघात आला होता. परंतु न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या मालिकेत सातत्याने केलेल्या गोलंदाजीमुळे त्याच्या कमरेला दुखापत झाली होती. तरी त्याने पुनरागमन केले आणि बांगलादेशविरुद्ध २००१ मध्ये त्याने केवळ ३१ धावा देत ५ विकेट्स चटकावल्या होत्या.
भारताविरुद्ध दमदार कामगिरी
ट्रेव्हिसने भारताविरुद्ध खूप चांगली कामगिरी केली आहे. विशेषत: शारजाहमध्ये त्याने २०००मध्ये कोका-कोला चषकादरम्यान भारताविरुद्ध २ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. ट्रेव्हिसने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly), युवराज सिंग (Yuvraj Singh) यांसारख्या दिग्गज फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखविला होता.
ट्रेव्हिसची कारकीर्द २००४ मध्ये आली संपुष्टात
ट्रेव्हिसची कारकीर्द झिंबाब्वेच्या अनेक दिग्गजांप्रमाणे २००४मध्ये संपुष्टात आली होती. त्याने झिंबाब्वेच्या राष्ट्रपतींचा विरोध केला होता, ज्यांनी संघात कोटा सिस्टीम (Qouta System) लागू केली होती. अँडी फ्लॉवर (Andy Flower), हीथ स्ट्रीकबरोबर (Heath Streak) ट्रेव्हिसनेही झिंबाब्वे संघ सोडला होता. यानंतर त्याने २००५मध्ये इंग्लंड काऊंटी क्लब डर्बीशायरकडून (Derbyshire County Cricket Club) खेळला, जिथे त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर तो लहान- लहान संघांकडून क्रिकेट खेळला. त्यानंतर त्याने क्रिकेट सोडून दिले.
ट्रेव्हिस एक व्यावसायिक पायलट बनला आणि यानंतर फ्लायबी आणि कतार एअरवेज यांसारख्या विमान कंपन्यांची विमाने उडवू लागला.
ट्रेव्हिसने २००१मध्येच खासगी पायलटचे प्रमाणपत्र मिळवले होते. २००६ मध्ये त्याने व्यावसायिक पायलट बनण्याचा विचार केला. ट्रेव्हिसने एक वर्षांपर्यंत याचे प्रशिक्षण घेतले आणि २००७ त्याला यूकेचा फ्लाईंग लायसन्स मिळाले.
ट्रेव्हिसचे आजोबाही पायलट होते आणि त्यांनी त्याला पायलट बनण्यासाठी प्रेरित केले होते. तो सध्या मिडल ईस्टमध्ये राहतो आणि वर्षात ३वेळा झिंबाब्वेला जातो. तो सर्व खेळाडूंना हाच सल्ला देतो, “क्रिकेटपटू बनण्याव्यतिरिक्त तुमच्याकडे असे काही ना काही असले पाहिजे. जेणेकरून तुम्ही घर चालवू शकाल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनीचा शेवटचा वनडे सामना ‘या’ परदेशातील खेळाडूला विसरणे केवळ कठीण
-कॅटरिनाचे नाव घेताच सलमान खानने दाखवला युवी- भज्जीला बाहेरचा रस्ता
-या जुळ्या भावांनी गाजवलंय क्रिकेटचं मैदान; केल्यात ३५ हजारपेक्षाही अधिक धावा