झिम्बाब्वे क्रिकेट संघाने आज इतिहास रचला. हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळवल्या गेलेल्या टी२० मालिकेतील दुसर्या रंगतदार सामन्यात त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला. यासह पाकिस्तानवर त्यांनी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला टी२० सामन्यातील विजय नोंदवला. तसेच तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
पाकिस्तान अवघ्या ९९ धावांवर ऑल आउट
या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी केवळ ११९ धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करतांना पाकिस्तानचा संघ एकवेळ ३ बाद ७८ अशा सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी चमत्कार केला. पाकिस्तानी फलंदाजांना एकामागोमाग माघारी धाडत त्यांनी अवघ्या ९९ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आणला. आणि ‘क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे’ याचा पुनःप्रत्यय दिला.
पाकिस्तानचा संघ ३ बाद ७८ अशा अवस्थेत असतांना कर्णधार बाबर आझम आणि दानिश अजीज फलंदाजी करत होते. मात्र १६व्या षटकांत बाबर आझम बाद झाल्यावर पाकिस्तानची घसरण सुरू झाली. पाकिस्तानच्या तब्बल ८ फलंदाजांना या डावात दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. तर ३ खेळाडू भोपळाही न फोडता माघारी परतले. झिम्बाब्वेकडून ल्युक जोंग्वेने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
झिम्बाब्वेने देखील केली होती निराशाजनक फलंदाजी
तत्पूर्वी, झिम्बाब्वेने देखील पहिल्या डावात निराशाजनक फलंदाजी केली होती. निर्धारित २० षटकांत त्यांनी ९ बाद ११८ धावा केल्या होत्या. सलामीवीर कमुनहुक्मावेच्या ३४ धावा ही त्यांच्या डावातील सर्वोत्तम खेळी ठरली. पाकिस्तानकडून मोहम्मद हसनैन आणि दानिश अजीजने प्रत्येकी २ बळी घेतले.
मात्र गोलंदाजांनी लाजवाब प्रदर्शन केल्याने झिम्बाब्वेला हा ऐतिहासिक विजय साकारणे, शक्य झाले. या टी२० मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता, मात्र आजचा सामना जिंकून झिम्बाब्वेने मालिकेत बरोबरी साधली आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना २५ एप्रिल रोजी याच मैदानावर खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
हिटमॅनने टाकले धोनीला मागे, आता या विक्रमात फक्त विराट, गंभीर आणि वॉर्नर रोहितच्या पुढे
रोहितने अखेर विराटला गाठलेच; अशी कामगिरी करणारा बनला चौथा फलंदाज
Video: निकोलस पूरनने घेतला डोळ्यांचे पारणे फेडणारा कृणाल पंड्याचा अप्रतिम झेल, एकदा पाहाच






