भारतीय पुरूष क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या (ZIMvsIND) दौऱ्यावर आहे. यामध्ये खेळल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यातील पहिला सामना गुरूवारी (१८ ऑगस्ट) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी यजमान संघाला सळो की पळो करून सोडले होते, मात्र पुन्हा एकदा विरोधी संघाच्या शेवटच्या फलंदाजांनी त्रास दिला आहे.
भारताचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरवत गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या दीपक चाहरने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्याने ७ षटकात २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आहेत. चाहरला बाकी गोलंदाजांची चांगली साथ लाभली आहे. प्रसिध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी देखील ३-३ विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.
चाहरने झिम्बाब्वेच्या दोन्ही सलामीवीरांना एकेरी धावेतच तंबूत पाठवले आहे. तादिवानाशे मारुमणी आणि इनोसंट काईया यांनी अनुक्रमे ८ आणि ४ धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ ८.१ षटकात २ बाद २६ धावा असा असताना सिराजने सीन विलियम्सला १ धावेवर बाद करत संघाला तिसरा धक्का दिला आहे. तर वेस्ली मधवेरे याचाही अडथळा चाहरने दूर केला. वेस्लीने ५ धावा केल्या. यामुळे एकंदरीत भारताच्या गोलंंदाजांनी पहिल्या वनडेत संघाला चांगली सुरूवात करून दिली.
झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चकाब्वा (Regis Chakabva) याने संघ संकटात असताना धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्याने सिंकदर रजासोबत पाचव्या विकेटसाठी ३६ चेंडूत ३५ धावांची भागीदारी केली. यामुळे भारतासाठी धोक्याची ठरणाऱ्या या भागादारीला तोडण्यात प्रसिध कृष्णा याला यश आले,
झिम्बाब्वेला सिकंदर रजा याच्याकडून नेहमीप्रमाणे मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रजा १२ धावा करताच बाद झाला. त्याला प्रसिधने बाद केले. तर त्याने चार षटकाच्या फरकाने रियान बर्ल याला त्रिफळाचीत करत झिम्बाब्वेची स्थिती ६ बाद ८३ धावा अशी केली. अक्षर पटेल याने कर्णधार रेगिस चकाब्वा याला बाद केले. त्याने ३५ धावा केल्या. यानंतर भारत लवकरच झिम्बाब्वेला सर्वबाद करेल अशी स्थिती असताना शेवटच्या फलंदाजांनी विशेष खेळी केली आहे.
ब्रॅड इव्हान्स आणि रिचर्ड नगारावा यांनी नवव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली आहे. इव्हान्सने नाबाद ३३ आणि नगारावाने ३४ धावा केल्या आहेत. यामुळे झिम्बाब्वेने ४०.३ षटकात सर्वबाद १८९ धावा केल्या. तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी ५० षटकात १९० धावा करण्याची आवश्यकता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच
थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श
सचिनचा ‘जिगरी दोस्त’ काढतोय पेन्शनवर दिवस! नोकरी आणि सचिनबद्दल विचारताच म्हणाला, “त्याने तर…”






