पुणे : सोयरा शेलार आणि शरयू रांजणे यांना पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी आहे. त्यांनी स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत सोयराने स्नेहा भिसेवर २१-१४, २१-१२ अशी मात केली. सोयरासमोर अंतिम फेरीत शरयू रांजणेचे आव्हान असेल. शरयूने शर्वरी सुरवसेवर २१-४, २१-४ अशी मात केली. सोयरा आणि शरयू दुहेरीत एकत्र खेळत आहे. त्यांनी उपांत्य फेरीत सई कदम – शिप्रा कदम जोडीवर २१-७, २१-९ असा विजय मिळवून अंतिम फेरीत गाठली.
अभिक-अरहमलाही संधी
अभिक शर्मा आणि अरहम रेदासानी यांनीही दुहेरी आगेकूच कायम राखली आहे. अभिक आणि अरहमने १५ वर्षांखालील एकेरी आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोघेही एकेरीच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. यात एकेरीच्या उपांत्य फेरीत अभिकने कपिल जगदाळेवर २२-२४, २१-१९, २१-१९ असा, तर अरहमने अभिज्ञान सिंघावर २१-१८, २१-९ असा विजय मिळवला. दुहेरीच्या उपांत्य फेरीत अरहमने तनीष्क काळेसह खेळताना चिन्मय फणसे-समीहन देशपांडे जोडीवर २२-२०, २१-९ अशी, तर अभिक वर्मा-स्वरीत सातपुते जोडीने कपिल जगदाळे – राघवेंद्र यादव जोडीवर २१-११, २५-२३ अशी मात केली.
सानिया-श्रेयात अंतिम लढत
स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीची अंतिम लढत सानिका पाटणकर आणि श्रेया भोसले यांच्यात रंगणार आहे. उपांत्य फेरीत श्रेयाने संस्कृती जोशीवर २१-१, २१-१० असा, तर सानिकाने जिज्ञासा चौधरीवर २१-१७, २१-१८ असा विजय मिळवला.
हिमांश-आरुष अंतिम लढत
स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत हिमांश हरगुनानीने बुरहनुद्दीन अगाशीवालावर २१-१९, २२-२० अशी मात केली. हिमांशची जेतेपदासाठी आरुष सप्रेविरुद्ध लढत होईल. आरुषने दुसऱ्या उपांत्य फेरीत अद्वैत फेरेवर २२-२०, २२-२० असा विजय मिळवला. मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत दिविशा सिंगने अग्रिमा राणावर २१-१७, २४-२२ अशी, तर वल्लारी वाटाणेने अन्वी बारवकरवर २१-४, २१-११ अशी मात केली.
निकाल – उपांत्य फेरी –
१३ वर्षांखालील मुली – ख्याती कत्रे वि. वि. रुद्रानीराजे निंबाळकर २३-२१, २१-६, आराध्या ढेरे वि. वि. कायरा रैना २१-११, १४-२१, २१-१७.
१३ वर्षांखालील मुले – एस. सोमजी वि. वि. मिर शाहझार अली २१-६, २१-५, हृदान पाडवे वि. वि. शारव जाधव २१-११, २१-११.
१५ वर्षांखालील मुले – अभिक वर्मा वि. वि. कपिल जगदाळे २२-२४ २१-१९, २१-१९, अरहम रेदासानी वि, वि. अभिज्ञान सिंघा २१-१८, २१-९.
१७ वर्षांखालील मुली – युतिका चव्हाण वि. वि. भक्ती पाटील २१-१३, २१-१७, सफा शेख वि. वि. जुई जाधव १६-२१, २१-१६, २१-११.
१७ वर्षांखालील मुले – सार्थक पाटणकर वि. वि. अवधूत कदम २१-१८, २१-१७, २१-११, कविन पटेल वि. वि. विहान मूर्ती १३-२१, २१-१४, २१-१९.
१९ वर्षांखालील मुली – श्रेया भोसले वि. वि. संस्कृती जोशी २१-१, २१-१०, सानिका पाटणकर वि. वि. जिज्ञासा चौधरी २१-१७, २१-१८.