खेळ हा लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करतात असे म्हटले जाते. आत्तापर्यंत असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांना केवळ त्यांच्या देशातच नाही तर जगभरातील लाखो चाहत्यांचे प्रमे मिळाले आहे. चाहते अशा खेळाडूंवर त्यांच्या देशाचा विचार न करता त्याच्या खेळावर प्रेम करतात. अशाच १० क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे, ज्यांना त्यांच्या देशाबाहेरही मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे.
स्वत:च्या देशाबाहेरही चाहत्यांचे प्रेम मिळवणारे १० क्रिकेटपटू –
१०. सचिन तेंडुलकर –
वयाच्या १६ वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुढे २४ वर्षे आपल्या खेळाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्याच्या खेळामुळेच नाही तर त्याच्या शांत आणि नम्र स्वभावामुळे त्याला भारतातच नाही जर जगभरातून आदर आणि प्रेम मिळाले. त्याच्या शेवटच्या सामन्याच्या वेळीही जगभरातून त्याला मानवंदना देण्यात आली होती.
सचिनने त्याच्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठे पराक्रम केले. त्याने १०० शतके करण्याचाही विश्वविक्रम केला. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे.
९. विराट कोहली –
भारताचा कर्णधार विराट कोहली सुरुवातीला त्याच्या आक्रमक स्वभावामुळे अनेकांसाठी टीकेचे लक्ष बनला होता. पण पुढे त्याने त्याच्या खेळात केलेल्या प्रगतीमुळे त्याने त्याचे स्वत:चे वेगळे स्थान चाहत्यांच्या मनात तयार केले. त्याने त्याच्या खेळाच्या जोरावर त्याचा आदर करण्यास चाहत्यांना भाग पाडले. आज विराटला भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत. त्याचे सोशल मीडियावरील फॉलोवर्सवरुनही हेच दिसते.
एवढेच नाही जर भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानमध्येही विराटचे चाहते असल्याचे दिसून आले आहे. तेच अनेक पाकिस्तानी खेळाडूंनीही विराटचे अनेकदा कौतुक केले आहे. विराटने आत्तापर्यंत अनेक मोठे पराक्रम केले असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतकेही केली आहेत.
८. ब्रायन लारा –
वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराची जेव्हाही चर्चा होते तेव्हा इंग्लंड विरुद्ध २००४ ला त्याने केलेल्या त्याच्या कसोटीतील नाबाद ४०० धावांच्या खेळीची आठवण काढली जाते. लाराने त्याच्या आक्रमक खेळीने अनेकांना मोहित केले होते.
३०० पेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळताना २० हजारांहून अधिक धावा करणाऱ्या लाराला केवळ कॅरिबियन बेटांमधूनच नाही तर जगभरातून चाहत्यांचे प्रमे मिळाले. त्याचा भारतातील चाहतावर्गही मोठा आहे.
७. ब्रेट ली –
आपल्या वेगाने अनेक फलंदाजांना भांबावून सोडणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज म्हणजे ब्रेट ली. साधरणत: ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांच्या स्लेजिंग आणि उद्दामपणामुळे ओळखले जाते. पण असे असले तरी असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांच्या खेळामुळे चाहत्यांच्या मनात आदर कमावला. ब्रेट लीही याच यादीतील खेळाडू.
तो अनेक फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत असला तरी त्याने त्याच्या खेळाने चाहत्यांच्या मनात प्रेम निर्माण केले. भारतातही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने एकदा आशा भोसलेंबरोबर गाणेही गायले आहे. एवढेच नाही तर त्याने ‘अनइंडियन’ या चित्रपटात कामही केले होते. ब्रेटलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७१८ विकेट्स घेतल्या आहेत.
६. ब्रेंडन मॅक्यूलम –
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम हा देखील जगभरातून चाहत्यांचे प्रेम मिळवलेला खेळाडू आहे. २०१५ च्या विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तसेच कसोटीत सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर असून तो कसोटीत त्रिशतक करणारा पहिला न्यूझीलंडचा खेळाडू देखील आहे.
मॅक्यूलमने त्याच्या वेगळ्या पण आक्रमक शैलीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे त्याची शैली आणि आक्रमकता अनेक चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. तसेच मॅक्यूलमने आयपीएलमध्येही पहिल्याच सामन्यात नाबाद १५८ धावांची खेळी करत भारतीयांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे त्यालाही चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले.
५. ख्रिस गेल –
युनिवर्स बॉस म्हणून ओळखला जाणाऱ्या ख्रिस गेलनेही त्याच्या उंच आणि लांब फटके मारत खेळण्याच्या शैलीमुळे अनेक चाहत्यांच्या मनात घर केले. एवढेच नाही तर सामना जिंकला असो किंवा पराभूत झाला असो त्याने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीमुळे चाहत्यांनी नेहमीच त्याचा आदर केला आहे.
तो कॅरेबियन बेटांवरच नाही तर कुठेही क्रिकेट खेळायला गेला तरी त्याला चाहत्यांचे प्रेम मिळते. गेलने जेवढे लीग क्रिकेट गाजवले आहे. तेवढेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळतानाही त्याची वेगळी छाप सोडली आहे. तो ३०० वनडे सामने खेळणारा वेस्ट इंडिजचा पहिला क्रिकेटपटू आहे.
४. ऍडम गिलख्रिस्ट –
जगभरातील अनेक चाहत्यांचे प्रेम मिळालेला आणखी एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट. गिलख्रिस्टने त्याच्या केवळ आक्रमक फलंदाजीनेच नाही तर त्याच्या उत्कृष्ट यष्टीरक्षणाच्या शैलीमुळेही एक वेगळे स्थान चाहत्यांच्या मनात निर्माण केले.
तो ज्याकाळात खेळला त्या काळात ऑस्ट्रेलिया एक बलाढ्य संघ मानला जात असल्याने जवळजवळ सर्वच संघ त्यांना मोठा प्रतिस्पर्धी मानत. पण असे असले तरी गिलख्रिस्टने मात्र त्याच्या खेळाने आणि स्वभावामुळे चाहत्यांची मने जिंकली होती. तो यष्टीरक्षकांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे. तसेच १५ हजारांपेक्षाही अधिक धावा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत.
३. एमएस धोनी –
भारताचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या शांत स्वभावामुळे ‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखला जातो. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली ३ महत्त्वाची आयसीसी विजेतेपदे मिळवली आहेत. एवढेच नाही तर धोनीने अनेकदा केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळेही अनेकांच्या मनात त्याने घर केले. तर अनेक जण त्याच्या चपळ यष्टीरक्षणाचे चाहते आहे. त्याच्यातील विविध शैलीमुळे त्याचा लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत जगभरात चाहता वर्ग पहायला मिळतो.
अनेकदा सुरक्षेची पर्वा न करता काही चाहत्यांनी त्याला भेटण्यासाठी मैदानातही झेप घेतली आहे. तर असेही काही वयस्कर चाहते आहेत, ज्यांनीही धोनीची आवर्जून भेट घेतली आहे. त्याचे व्हिडिओ आणि फोटोही अनेकदा व्हायरल झाले आहेत.
२. केन विलियम्सन –
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनलाही जगभरातील चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळत असते. त्याच्या शांत स्वभावामुळे आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे त्याने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यात २०१९ च्या विश्वचषकातील अंतिम सामना सुपर ओव्हरनंतरही बरोबरीत सुटल्यानंतरही पराभव स्विकारताना त्याने दाखवलेल्या नम्रतेमुळे आणि खिलाडूवृत्तीमुळे चाहत्यांच्या मनात त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला होता.
२०१० ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलेल्या विलियम्सनने काही दिवसातच फॅब ४ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते. तो सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी शतके करणाराही फलंदाज आहे. त्याने २१ कसोटी शतके केली आहेत.
१. एबी डिविलियर्स –
भारतात सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेळाडू म्हणून एबी डिविलियर्सला ओळखले जाते. डिविलियर्सने त्याच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याच्या शैलीमुळे त्याचा वेगळा चाहतावर्ग तयार केला. त्याने त्याच्या खेळाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आदर मिळवला. केवळ दक्षिण आफ्रिका किंवा भारतातच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या अन्य देशातही डिविलियर्सचा चाहत्यांकडून प्रेम मिळत असते.
भारतात तर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या पोस्टरवर दूधाचा अभिषेक करणारे चाहतेही पहायला मिळाले आहेत. डिविलियर्स हा वनडेत सर्वात जलद शतक करणारा फलंदाज आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २०१५ ला ३१ चेंडूत शतकी खेळी केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी –
टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारे २ धडाकेबाज फलंदाज
आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानला विश्वचषकात ७व्यांदा पाजले होते पाणी
१२ पेक्षा कमी चेंडू खेळूनही मॅन ऑफ द मॅच ठरलेले ३ खेळाडू