१९९४-२००६ असे तब्बल एक तप इंग्लंड क्रिकेट संघाची सेवा करणाऱ्या दिग्गज वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ याचा आज ५२ वा वाढदिवस..
इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून गॉफचा उल्लेख केला जातो. ५ फूट ११ इंचाची उंची व काहीशा स्थूल शरीराचा असला तरी, गॉफने वेगवान गोलंदाज म्हणून, धैर्य, गतिशीलता व आत्मविश्वास दाखवत मैदानावर एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला प्रस्थापित करत, टीकाकारांची तोंडे बंद केली.
दोन्ही बाजुनी चेंडूला स्विंग करण्याच्या आपल्या कौशल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत, इंग्लिश क्रिकेटमध्ये स्वतःचे अढळ स्थान मिळवले. रायनो व डॅझलर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या गॉफच्या ५२व्या वाढदिवशी त्याच्याबद्दल माहित नसलेल्या १० रंजक गोष्टी आपण जाणून घेऊया.
१) क्रिकेटकडे वळण्याआधी गॉफ एक प्रतिभावंत फुटबॉलपटू होता. वायटीएस फुटबॉल क्लबसाठी १७ वर्षाखालील संघात तो सातत्याने खेळत असत.
२) डॅरेन गॉफ कारकिर्दीच्या सुरुवातीला खूपच स्थूल होता. त्यामुळे अनेक जण त्याच्यावर टीका करत. लोकांचे असे म्हणणे होते की, गॉफच्या शरीरासारखा खेळाडू वेगवान गोलंदाजला आवश्यक अशी तंदुरुस्ती टिकवू शकणार नाही.
३) वेस्ट इंडिजचे महान खेळाडू रिची रिचर्डसन गॉफच्या खेळण्याच्या दिवसात यॉर्कशायर क्लबचा भाग होते. १९९३ मध्ये रिचर्डसन यांनी त्याला टिकांवर दुर्लक्ष करून, आपल्या वेगावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. रिचर्डसन यांनी दिलेल्या मुलमंत्राचे पालन गॉफने संपूर्ण कारकिर्दीत केले.
४) न्यूझीलंड विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात गॉफने सहा बळी व ६५ धावा काढत यशस्वी पदार्पण केले. त्यावेळी इंग्लिश मीडियाने “नवा बोथम” अशी उपाधी त्याला दिली.
५) १९९९ ऍशेजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने आपल्या कारकिर्दीतील एकमेव हॅटट्रिक घेतली. कोणत्याही, इंग्लिश गोलंदाजाने १०० वर्षांनंतर ऍशेज मालिकेत घेतलेली ती पहिली हॅटट्रिक होती. या हॅटट्रिकवेळी इयान हिली, स्टुअर्ट मॅकगिल आणि कॉलिन मिलर हे त्याचे बळी ठरले होते.
६) इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणारा पहिला गोलंदाज होण्याची कामगिरी गॉफने केली होती.
७) २००३ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे गॉफला कसोटी क्रिकेटमधून अकाली निवृत्ती घ्यावी लागली होती. एकदिवसीय क्रिकेटप्रमाणेच कसोटी क्रिकेट गाजवताना त्याने ५८ कसोटींत २२९ बळी मिळवले होते.
८) २००५ मध्ये “स्ट्रिक्टली कम डान्सिंग” या रियालिटी शोमध्ये तो लायला कोपीलोवा हिच्या समवेत सहभागी झाला. त्यामुळे त्याला भारत दौऱ्यावरील संघातून वगळण्यात आले.
९) २ सप्टेंबर २००६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीवेळी त्याच्या नावे ४६६ आंतरराष्ट्रीय बळी होते. यात कसोटीत २२९, वनडेमध्ये २३५ व टी२० मधील ३ बळींचा समावेश होता.
१०) २००९ मध्ये त्याने काँझर्व्हेटिव्ह पक्षाकडून निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. फेब्रुवारी २०११ मध्ये बार्न्सली सेंट्रल पोटनिवडणुकीसाठी डेव्हिड कॅमेरून यांनी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार म्हणून गॉफला संधी देण्याचे निश्चित केले होते. मात्र, गॉफने वैयक्तिक कारणास्तव हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिडाविश्वात हळहळ! चालू मॅरथॉन स्पर्धेत धावपटूवर ओढावला मृत्यू
जयवर्धनेची भविष्यवाणी! टी-20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू नसल्यामुळे भारताला सोसावे लागणार नुकसान
‘ब्लू जर्सी’त पुनरागमन करण्यासाठी उमेश यादव तयार, 43 महिन्यांनंतर खेळणार टी-20 मालिका