कसोटीमध्ये प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक खेळाडूला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे एखाद्या डावात एखाद्या खेळाडूला चांगली कामगिरी नाही करता आली तरी त्याला दुसऱ्या डावात पुन्हा एक संधी मिळते. पण काही असे दुर्दैवी फलंदाज आहेत, जे कसोटीच्या दोन्ही डावात शुन्यावर बाद झाले आहे.
कसोटीच्या दोन्ही डावांत फलंदाज शून्यावर बाद झाला तर त्याला ‘पेअर’ असे म्हटले जाते. तसेच कसोटीच्या दोन्ही डावांत फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला तर त्याला ‘किंग पेअर’ असे म्हटले जाते.
अशाच काही दिग्गज क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे, जे कसोटीच्या दोन्ही डावात शुन्यावर बाद झाले आहेत.
१०. ऍलेन बॉर्डर –
१९८७ च्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधार ऍलेन बॉर्डर यांना नेहमीच दिग्गज कर्णधारांमध्ये गणले जाते. कसोटीमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारे ते दुसरे फलंदाज आहेत. तसेच ते सलग १५३ कसोटी सामने देखील खेळले आहेत. पण याबरोबरच बॉर्डर यांचा कसोटीच्या एका सामन्यातील दोन्ही डावात शुन्यावर बाद होण्याऱ्या फलंदाजांच्या यादीतही समावेश आहे.
ते १९९३ ला पर्थ येथे झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शुन्यावर बाद झाले होते. त्यांना पहिल्या डावात कर्टली अँब्रोसने तर दुसऱ्या डावाच इयान बिशप यांनी बादे केले होते.
९. स्टिफन फ्लेमिंग –
न्यूझीलंडचे कॅप्टनकूल असणारे स्टिफन फ्लेमिंग यांचाही एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात शुन्यावर बाद होण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. ते होबार्ट येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळत असताना दोन्ही डावात शुन्यावर बाद झाले होते. विशेष म्हणजे ते त्या सामन्यात न्यूझीलंडचे कर्णधार होते.
पहिल्या डावात त्यांना स्टिव वॉ यांनी तर दुसऱ्या डावात शेन वॉर्नने बाद केले होते. स्टिफन फ्लेमिंग हे न्यूझीलंडकडून १०० कसोटी सामने खेळणारे पहिले क्रिकेटपटू आहेत.
८. मार्क वॉ –
आक्रमक फटके आणि शानदार क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जाणारे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मार्क वॉ त्यांच्या कसोटी कारकिर्दीत सलग दोन कसोटी सामन्यातील प्रत्येकी २ डावात शुन्यावर बाद झाले आहेत.
ते १९९२ ला श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांच्या मिळून चार डावात शुन्यावर बाद झाले होते. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्यांना चंपक रामनायके यांनी तर दुसऱ्या डावात मुथय्या मुरलीधरने बाद केले होते. तसेत तिसऱ्या कसोटीतही पहिल्या डावात रामनायकेने त्यांना त्रिफळाचीत केले होते. तर दुसऱ्या डावात दुलिप लियानगेने बाद केले होते.
७. विजय हजारे –
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतानेे पहिला विजय हा विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली १९५२ ला मद्रास (चेन्नई) येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना मिळवला होता. तसेच ते कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करणारे पहिले भारतीय सुद्धा आहेत. त्यांच्या नावाने भारतात देशांतर्गत स्पर्धाही खेळवली जाते.
पण असे असले तरी कसोटीच्या दोन्ही डावात शुन्यावर बाद होणारे पहिले भारतीय, असा नकोसा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. ते १९५२ ला कानपूर येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शुन्यावर बाद झाले होते.
६. मार्क टेलर –
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी बॉर्डर यांच्यानंतर यशस्वीरित्या नेतृत्वाची धूरा सांभाळली. ते सलामीला दमदार फलंदाजी करण्यासाठी ओळखले गेले. एवढेच नाही तर त्यावेळी त्यांनी सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक होण्याचाही विक्रम केला होता. १०४ कसोटी सामने खेळलेले टेलर यांनी ७००० पेक्षाही अधिक धावा केल्या.
पण या दरम्यान जेव्हा ते नुकतेच कसोटी कर्णधार झाले होते. त्यावेळी ते १९९४ला कराची येथे पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामना खेळताना दोन्ही डावात शुन्यावर बाद झाले होते. ते पहिल्या डावात वासिम आक्रमच्या तर दुसऱ्या डावात वकार युनुसच्या गोलंदाजीवर बाद झाले होते.
५. अजित अगरकर –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अजित अगरकरही सलग २ कसोटी सामन्यांमधील सलग ४ डावात शुन्यावर बाद झाला होता. तो १९९९-२००० च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न आणि सिडनी कसोटीमध्ये शुन्यावर बाद झाला होता. मेलबर्न कसोटीत त्याला ब्रेट ली आणि मार्क वॉने बाद केले होते. तर सिडनी कसोटीत ली आणि ग्लेन मॅकग्रा यांनी बाद केले होते.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ ला भारतात झालेल्या कसोटी मालिकेतील मुंबई कसोटीतही दोन्ही डावात तो शुन्यावर बाद झाला होता. त्यावेळी त्याला शेन वॉर्न आणि मार्क वॉने बाद केले होते. त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग ७ डावात शुन्यावर बाद होण्यामुळे त्याला बाँबेडक असेही नाव पडले होते.
४. फाफ डू प्लेसिस –
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस हा एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात शुन्यावर बाद होऊनही सामना जिंकणारा पाचवा कर्णधार आहे. तो २०१८ ला सेंच्यूरियन येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट्सने जिंकला होता.
विशेष म्हणजे याच सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदही दोन्ही डावात शुन्यावर बाद झाला होता. त्यामुळे एकाच कसोटी सामन्यात दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही डावात शुन्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होती.
३. ऍडम गिलख्रिस्ट –
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्ट त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला गेला. पण तरीही त्याचाही एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावात शुन्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश आहे. ९६ कसोटी सामने खेळताना ५५०० पेक्षा अधिक धावा करणारा गिलख्रिस्ट २००१ च्या ऐतिहासिक कोलकाता कसोटीत दोन्ही डावात शुन्यावर बाद झाला होता.
ती कसोटी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या फॉलोऑन नंतरच्या भागीदारीसाठी आणि हरभजन सिंगच्या हॅट्रिकसाठी प्रसिद्ध आहे. त्या कसोटीत पहिल्या डावात हरभजनने घेतलेल्या हॅट्रिकमध्ये गिलख्रिस्टच्या विकेटचाही समावेश आहे. त्यावेळी गिलख्रिस्ट शुन्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात गिलख्रिस्ट सचिन तेंडुलकरच्या चेंडूवर शुन्य धावेवर बाद झाला होता.
२. विरेंद्र सेहवाग –
भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग हा नेहमीच त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तो भारताकडून कसोटीत २ त्रिशतके करणाराही पहिलाच फलंदाज आहेे. पण असे असले तरी त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही आहे.
त्याला त्याच्या कारकिर्दीत एकदा किंगपेअरही मिळाली आहे. म्हणजेच तो एका कसोटीत दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. हा नकोसा विक्रम त्याने २०११ च्या इंग्लंड दौऱ्यातील एजबस्टन कसोटीत केला होता. त्याला त्या कसोटीत पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने तर दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनने शुन्यावर बाद केले होते. त्यावेळी तो किंगपेअर मिळवणारा भागवत चंद्रशेखर आणि अजित अगरकरनंतरचा तिसरा भारतीय ठरला होता.
१. एबी डिविलियर्स –
मैदानाच चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असल्याने मिस्टर ३६० अशी ओळख मिळवलेल्या एबी डिविलियर्सच्या कारकिर्दीत एका कसोटीत दोन्ही डावात शुन्यावर बाद होण्याची नकोशी घटना घडली आहे. तो २०१६ ला इंग्लंड विरुद्ध सलग तीन डावात शुन्यावर बाद झाला होता. यात जोहान्सबर्ग आणि सेंच्यूरियन या कसोटी सामन्यांचा समावेश आहे.
तो जोहान्सबर्ग कसोटीत दुसऱ्या डावात शुन्यावर बाद झाला होता. तर सेंच्यूरियन कसोटीत दोन्ही डावात शुन्यावर बाद झाला होता. त्याला सेंच्यूरियन कसोटीत पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने तर दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनने शुन्यावर बाद केले होते.
ट्रेंडिंग लेख –
हे आहेत जगातील सध्याचे घडीचे ४ सर्वोत्तम गोलंदाज
एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत ७१० विकेट्स
आणि १९ वर्षांचा इरफान पठाण म्हणतं होता, मला पाकिस्तानला पाठवू नका