जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामाची तयारी सुरू आहे. ज्याचा दुसरा टप्पा युएई येथे खेळविण्यात येणार आहे. त्याचवेळी आयपीएलच्या २०२२ हंगामाकडे अनेकांचे लक्ष लागले असून, पुढील वर्षी लीगमध्ये दोन नवीन संघांची भर पडणार आहे. यामुळे आयपीएलमध्ये १० संघांची स्पर्धा होईल. २०१४ पासून आयपीएल केवळ आठ संघांदरम्यान खेळली जात आहे.
दोन नव्या संघांची पडणार भर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक आघाडीचे सेलिब्रिटी व व्यावसायिक कंपन्या नव्या संघांची मालकी मिळविण्यास उत्सुक असतील. आठपेक्षा अधिक संघ आयपीएलमध्ये भाग घेण्याची ही पहिली वेळ नाही. २०११ मध्ये १० संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता तर, पुढील दोन हंगामात नऊ फ्रँचायझींचा सहभाग होता.
इच्छुक कंपन्यांनी नवीन फ्रँचायझींचा लिलाव जवळ येत असल्याने लवकरच त्याची रणनीती निश्चित करणे आवश्यक आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएल- १४ च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी दोन्ही संघांसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार करतेय. जुलैमध्येच नवीन संघ आयपीएलशी जोडण्याचे काम केले जाईल, अशी शक्यता आहे.
खेळाडूंना मिळणार अधिक संधी
फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या एका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, “आम्हाला समजले आहे की, पुढील महिन्यात नवीन आयपीएल संघांसाठी निविदा काढल्या जातील, आम्ही याची बरीच प्रतीक्षा करत होतो. फ्रँचायझीसाठी आधारभूत किंमत २५ कोटी ठेवली जाऊ शकते. आयपीएल २०२२ साठी मेगा लिलावही होईल. दोन नवीन फ्रँचायझी आल्यामुळे खेळाडूंना अधिक संधी निर्माण होतील.”
सप्टेंबरमध्ये सुरू होणार आयपीएलचा हंगाम
आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचे अधिकृत वेळापत्रक अजून येणे बाकी आहे. कोरोना विषाणूमुळे भारतात होणारी ही आयपीएल मध्यात तहकूब करावी लागली होती. आतापर्यंत या लीगच्या १४ व्या हंगामातील २९ सामने खेळले गेले आहेत. या हंगामानंतर आयसीसी टी२० वर्ल्ड कप होणार आहे, त्यामुळे अनेक परदेशी खेळाडू लीगच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! २०२१ टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, या तारखेपासून होणार सामन्यांना सुरुवात
अहो अश्चर्यम! अमेरिकेच्या फ्लॉयड मेवेदरने एका ‘खोट्या’ सामन्यातून कमावले तब्बल ७४३ कोटी