आजपासून(4 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या ऍशेस कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉर्नरचा झेल यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने घेतला. त्यामुळे वॉर्नरला एकही धाव न करता बाद व्हावे लागले.
विशेष म्हणजे वॉर्नरची कसोटीमध्ये आत्तापर्यंत ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद होण्याची ही 10 वी वेळ आहे. त्यामुळे ब्रॉडने कसोटीत वॉर्नरला सर्वाधिकवेळा बाद करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने हा पराक्रम करताना आर अश्विन आणि जेम्स अँडरसनला मागे टाकले आहे.
भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसनने वॉर्नरला कसोटीमध्ये प्रत्येकी 9 वेळा बाद केले आहे.
या चौथ्या ऍशेस सामन्यात वॉर्नर बाद झाल्यानंतर काहीवेळात मार्कस हॅरिसलाही ब्रॉडने 13 धावांवर बाद केले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव मार्नस लॅब्यूशाने आणि स्टिव्ह स्मिथने पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 70 धावांची भागीदारी करत सावरला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत पहिल्या डावात 26 षटकात 2 बाद 98 धावा केल्या आहेत. लॅब्यूशाने 49 धावांवर तर स्मिथ 28 धावांवर नाबाद खेळत आहे.
कसोटीमध्ये डेव्हिड वॉर्नरला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज –
10 – स्टुअर्ट ब्रॉड
9 – जेम्स अँडरसन
9 – आर अश्विन
6 – उमेश यादव
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहली, पृथ्वी शॉपेक्षा माझा प्रवास खूप वेगळा आहे…
–हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, टीम इंडियामधील ‘हा’ खेळाडू सर्वात महत्त्वाचा
–२०२० आयपीएलमध्ये आर अश्विन खेळणार ‘या’ संघाकडून