भारतातील क्रीडा क्षेत्रामधील सर्वोच्च मानला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आगामी काळात दिले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रा आणि कुस्तीमध्ये रौप्य पदक विजेलेल्या रवि दहियासह इतर ११ भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच क्रिकेटपटू शिखर धवनसह ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जाणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दर वर्षी २९ ऑगस्टला मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. मात्र, यावर्षी या कार्यक्रमाला उशीर झाला आहे, कारण यावर्षी याच कालावधीत टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा खेळल्या जात होत्या आणि त्यामुळेच या स्पर्धा संपल्यानंतर हे पुरस्कार देण्याचे ठरवले गेले होते.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, रवि दहिया यांच्याव्यतिरिक्त ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी बॉक्सर लवलीना बोरगोहीन, हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश, तसेच भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांच्या नावाचाही समावेश आहे.
अर्जुन पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेल, पॅरा बॅडमिंटन खेळाडू सुहास यथिराज आणि उंच उडीमधील निषाद कुमार यांच्या नावांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारताच्या हॉकी संघाच्या सर्व खेळाडूंनाही अर्जून पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवडले गेलेले ११ खेळाडू – नीरज चोप्रा, रवि दहिया, हॉकी गोलरक्षक पीआर श्रीजेश, भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री, महिला क्रिकेटपटू मिताली राज, महिला बॉक्सर लवलीना बोरगोहीन, पॅरा बॅडमिंटन खेळाडू प्रमोद भगत, सुमित अंतिल, अवनि लेखरा, कृष्णा नागर आणि मनीष नरवाल.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्यांनी पराभूत केले त्याच पाकिस्तानी गोलंदाजांचे केन विलियम्सनकडून तोंड भरून कौतुक; म्हणाला…
शोएब अख्तर म्हणतोय, ‘न्यूझीलंडला पराभूत करून आम्ही भारताला वाचवले, चांगले शेजारी असंच करतात’
‘मला वाटतं सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्या आयपीएल संघ विकत घेऊ शकतात’, ललित मोदींनी साधला निशाणा