-शरद बोदगे
प्रो-कबड्डी २०१८ला आॅक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. या स्पर्धची जोरदार चर्चा लिलावापासूनच सुरु झाली आहे.
या हंगामापूर्वी लिलाव पार पडल्यामुळे अनेक मोठ्या खेळाडूंचे मुळ संघ बदलले आहे. अशा वेळी कोणता खेळाडू कोणत्या संघाचे नेतृत्व करणार याबद्दल जोरदार चर्चा आता रंगु लागल्या आहेत.
या हंगामात हे १२ खेळाडू कर्णधार म्हणुन येऊ शकतात कर्णधार-
युपी योद्धाज-
महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत २०१८मध्ये विजेतेपद मिळवुन देणाऱ्या रिशांक देवाडीगाच्या नेतृत्वावर त्या स्पर्धेने एकप्रकारे शिक्कामोर्तब केले. हा खेळाडू एक चांगला कर्णधार आहे हे त्या स्पर्धेमुळे खऱ्या अर्थाने चाहते तसेच कबड्डी जाणकारांना समजले. आजपर्यंत विविध कर्णधारांच्या नेतृत्वाखाली तसेच स्व:तही कर्णधार राहिलेल्या रिशांकवर यावेळी युपीने विश्वास दाखवत तब्बल १ कोटी ११ लाख मोजले. त्याचवेळी अप्रत्यक्षपणे त्याच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
यावेळी रिशांकला श्रीकांत जाधव, प्रशांत कुमार रायसारखे टाॅप रेडर तर जिवा कुमार सारखा बचाव फळीतील खेळाडूचे नेतृत्व करायला मिळू शकते.
यु मुंबा-
इराणी प्रशिक्षक त्यात इराणचाच असलेला आणि प्रो कबड्डीमध्ये बचाव फळीत अतिशय मोठं नाव असलेल्या फजल अत्राचलीकडे यु मुंबाचा ६व्या हंगामातील कर्णधार म्हणुन पाहिले जात आहे. प्रो कबड्डीमधील पहिला करोडपती खेळाडू अशी ओळख असलेला फजल डाव्या कोपऱ्यासाठी ओळखला जातो.
यु मुंबा प्रथमच त्यांचा ५ हंगाम कर्णधार राहिलेल्या अनुप कुमार शिवाय या स्पर्धेत खेळणार आहे. तर गेल्या हंगामात गुजरातला आपला खेळ आणि कर्णधारपद अशा दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करत फजलने अंतिम फेरीत नेले होते. संघातील सर्वात मोठे नाव, सर्वात महागडा खेळाडू तसेच पाठीमागील कामगिरी यामुळे फजल शिवाय कर्णधारपदासाठी नक्कीच मोठे नाव नाही.
तेलुगु टायटन्स-
प्रो-कबड्डीच्या सर्वच हंगामात एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू म्हणजे राहुल चौधरी. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ज्याप्रमाणे गेले ११ हंगाम एकाच संघाकडून खेळत आहे तसाच पराक्रम कबड्डीच्या या पोस्टर बाॅयने केला आहे.
प्रो-कबड्डीमध्ये विक्रमांचे मनोरे रचणाऱ्या राहुल आणि विराटमधील एक खास गोष्ट म्हणजे देशातील या अनुक्रमे प्रो-कबड्डी आणि आयपीएलमध्ये विक्रमांचे विक्रम या दोघांच्या नावावर आहे. परंतु कर्णधार म्हणुन दोघांनाही मोठे अपयश आले आहे. असे असले तरी तेलुगुने त्याला एवढी मोठी रक्कम मोजली आहे ती त्याच्याकडे एक कर्णधार तसेच संघाचा मुख्य रेडर म्हणुन जबाबदारी देण्यासाठीच. तसेही या संघातही नेतृत्व करण्यासाठी राहुलसारखा मोठा खेळाडू नक्कीच नाही.
तमिल थलावइवाज-
भारतीय संघाचा कर्णधार प्रो-कबड्डीमध्ये ज्या संघात असेल तो एकप्रकारे आपोआप त्या संघाचा कर्णधार होतोच. प्रो-कबड्डीमधील जवळपास ५-६ कर्णधार ज्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेत तसेच एशियन गेम्समध्ये खेळणार आहेत त्या अजय ठाकूर या संघाचे नेतृत्व करणार हे जवळपास निश्चित आहे. याच खेळाडूने अाशियायी कबड्डी स्पर्धेत भारताला विजेतेपदं मिळवुन दिले होते.
सुकेश हेगडे, सुरजित सिंग, मनजित चिल्लर आणि जसविर सिंग ही मोठी नावे जरी या संघात असली आणि सर्वांना जरी कर्णधारपदाचा थोडाअधिक अनुभव असला तरी त्यांना अजयच्याच नेतृत्वाखालीच खेळावे लागेल यासाठी कोणत्या तज्ञाची गरज नक्कीच पडणार नाही. २२ सामन्यात २२२ गुण प्रो-कबड्डीच्या ५व्या हंगामात घेणाऱ्या या खेळाडूला त्यामुळे एक कॅप्टन मटेरियल म्हणुन पाहिले जाते. तसेच त्याचा अफाट अनुभव संघाला वेळोवेळी उपयोगाला येऊ शकतो.
पुणेरी पलटन-
प्रो- कबड्डीमध्ये कर्णधारपद देताना जर संघात चांगला रेडर असेल आधी त्याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतर अष्टपैलु खेळाडू आणि त्यानंतर बचावफळीतील खेळाडूकडे पाहिले जाते. पुणेरी पलटनने या हंगामात संदीप नरवाल, जीबी मोरे आणि राजेश मोंडाल सारखे खेळाडू लिलावापुर्वीच संघात कायम केले.
तसेच ५व्या हंगामातील कर्णधार दिपक हुडाला मात्र त्यांनी संघात घेतले नाही तसेच लिलावातही त्याच्यासाठी एफबीएम कार्ड वापरले नाही. हा संघ कर्णधारपदासाठी लिलावात एखाद्या मोठ्या खेळाडूवर बोली लावेल असे वाटतं होते परंतु त्यांनी तसे केले नाही. गेल्या हंगामातील सर्वात महागडा आणि दिपकच्या तोडीस तोड असा खेळाडू नितीन तोमर या संघाने आपल्या ताफ्यात घेतला, परंतु जर निट विचार केला तर हा संघ कर्णधार म्हणुन संदिप नरवाललाच पहिली पसंती देईल. गेल्या हंगामात या खेळाडूकडे कर्णधारपद येईल अशी अपेक्षा असताना ती माळ दिपक हुडाच्या गळ्यात पडली होती. मॅटवर खेळण्याचा मोठा अनुभव असलेला खेळाडू, तसेच दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेसाठी झालेली निवड, भारतीय संघाचा नियमीत सदस्य तसेच एक मोठा चाहता वर्ग आणि त्याच्या जोडीला अष्टपैलु कामगिरी यामुळे हा संघ नक्कीच संदीप या संघाचा कर्णधार होईल असे वाटते.
पटना पाररेट्स-
या संघाचा कर्णधार कोण असेल यावर सर्वांच एकमत सहज होऊ शकत. डुबकी किंग प्रदीप नरवाल या संघाचा कर्णधार असेल. याच खेळाडूच्या नेतृत्वाखाली पटनाने गेल्या हंगामात विजेतेपदाची डुबकी मारली होती. या हंगामात त्याचा खास मित्र मोनु गोयत या संघासोबत नसुन त्याला सुरेंदर सिंग, दिपक नरवाल आणि तुषार पाटील या खेळाडूंच्या सोबत पटनाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवुन द्यावे लागणार आहे.
जयपुर पिंक पॅंथर-
या संघाचा कर्णधार कोण असणार आहे याचे स्पष्ट संकेत या संघाचा मालक अभिषेक बच्चनने लिलावाच्यावेळी पत्रकार परिषदेत दिले होते. ५ हंगाम मुंबईच नेतृत्व केलेल्या अनुप कुमारकडेच या संघाचं नेतृत्व दिलं जाणार हे अभिषेकच्या प्रत्येक वाक्यातून जाणवतं होत. पुणेरी पलटनचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू दिपक हुडा जरी या संघात असला तरी एक मोठा अनुभव असलेल्या आणि तब्बल ५ हंगाम कर्णधारपदी राहिलेल्या अनुपला याचमुळे केवळ ३० लाख मोजत जयपुरने आपल्या ताफ्यात घेतले. त्याने जर या हंगामात कर्णधारपद सांभाळले तर प्रो-कबड्डी इतिहासात सर्व हंगामात कर्णधारपदी राहणारा तो पहिला कर्णधार बनणार आहे.
गुजरात फाॅर्च्युन जायंट्स-
नवा संघ प्रो-कबड्डीमध्ये काय करु शकतो याचे मोठे उदाहरण म्हणजे गुजरात फाॅर्च्युन जायंट्स आणि नवा संघाबद्दल निर्णय घेताना किती चुकू शकतो याचेही खास उदाहरण म्हणजे हा संघ. ज्या खेळाडूच्या जिवावर हा संघ गेल्या हंगामात प्रो-कबड्डी फायनल खेळला त्या फजल अत्राचलीला या संघाने आपल्या ताफ्यात घेतले नाही. शिवाय लिलावातही त्याला एफबीएम कार्ड वापरण्यात आले नाही. अतिशय तरुण खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ या हंगामात सचिन तंवर या खेळाडूला कर्णधार म्हणुन पहिली पसंती देईल असे बोलले जात आहे. सचिन तंवर हाच या संघातील सर्वात महागडा खेळाडू असुन त्याला गुजरातने केवळ ५६.८७ लाखांत संघात घेतले आहे. या संघाकडे के प्रपंजनसारखा एक मोठा खेळाडूही आहे.
दबंग दिल्ली-
भारतातील कोणत्याही लीगमध्ये चाहत्यांचा ओढा या संघाकडे तसा कमीच असतो. या संघाचा नक्की कोण कर्णधार आहे हे बऱ्याच वेळा चाहते विसरुनही जातात. या संघाने ६व्या हंगामासाठी रविंद्र पहल, मेराज शेख, पवन कुमार, शब्बीर बापु, विशाल माने असे अनुभवी खेळाडू आहेत. परंतु हा संघ मेराज शेखला कर्णधार म्हणुन पहिली पसंती देऊ शकतो. रविंद्र पहल सारख्या मोठ्या खेळाडूला या लिलावात कुणीही बोली लावायला तयार नव्हते तेव्हा या संघाने त्याला आपल्या संघात केवळ २० लाखांत आपल्या संघात घेतले तर मेराजला तब्बल ६५ लाख या संघाने मोजले. विशाल माने, शब्बीर बापु सारखे खेळाडू संघात असताना हा खेळाडू या संघाचे नेतृत्व कसे करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बेंगलुरु बुल्स-
पटनाप्रमाणेच जेव्हा लिलावापुर्वी या संघाने रोहित कुमारला आपल्या संघात कायम केले तेव्हाच हा संघ आपला कर्णधार बदलणार नाही हे स्पष्ट झाले होते. प्रो- कबड्डीमधील एक मोठा स्टार खेळाडू म्हणुन त्याच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रीय स्पर्धा तसेच फेडरेशन कपला या खेळाडूचा खेळ चाहत्यांना पाहता आला नाही. सेनादलमध्ये असलेल्या या खेळाडूच्या सुट्ट्या न मिळाल्यामुळे तो या दोन स्पर्धांमध्ये खेळू शकला नव्हता. परंतु या हंगामात नक्कीच त्याने आपल्या सुट्ट्या राखुन ठेवत बेंगलुरुसाठी मोठी कामगिरी करण्याचा निश्चय केला असणार आहे.
कर्णधारपदाचा कोणताही परिणाम हा खेळाडू आपल्या कामगिरी होऊ देत नाही. गेल्या हंगामात एका सामन्यात रेडिंगमध्ये सर्वाधिक गुण घेण्याचा कारनामा त्याने केला होता. पुढे तो विक्रम रिशांक देवाडिगाने मोडला. अन्य खेळाडूंची साथ न मिळाल्यामुळे स्पर्धेत विजेतेपदापासुन दुर राहिलेल्या या संघात यावेळी काशिलिंग अडके आणि पवन कुमारसारखे मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये या संघाच नक्कीच नाव आहे.
बेंगाल वाॅरियर्स-
गेल्या हंगामात जेव्हा सुरजीत सिंगने बंगाल वाॅरियर्सचे सारथ्य करायला सुरुवात केली तेव्हा हा संघ एका वेगळ्याच प्रकारची उच्च दर्जाची कबड्डी खेळताना दिसला. गेले कित्येक हंगाम चाचपडत असलेल्या या संघाला सुरजितमुळे एक चांगला नायक मिळाला आहे. याच खेळाडूच्या नेतृत्वाखाली बंगाल गेल्यावर्षी ब गटात अव्वल राहिले परंतु त्यांना विजेत्या पटना पायरेट्सकडून क्वाॅलिफायर्समध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. जान कुन ली आणि झिऊर रहेमान सारख्या खेळाडूंमुळे हा संघ एक भक्कम संघ म्हणुन पुढे येऊ शकतो.
आयपीएलप्रमाणेच यावर्षी प्रो-कबड्डीमध्ये बाहेरच्या देशातील खेळाडूही संघाचे कर्णधार दिसु शकतात. तसेच या लीगमध्ये रिशांक देवडिगा सोडला तर अन्य कोणत्याही महाराष्ट्राच्या खेळाडूची कर्णधार म्हणुन निवड होण्याची संधी खुपच कमी आहे. पुढील काही महिन्यात सर्वच संघ आपले कर्णधार जाहीर करतील. काही संघ धक्का तंत्रही वापरुन एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देतात का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.