क्रिकेट इतिहासातील एका दुर्दैवी घटनेला आज बरोबर १३ वर्ष पूर्ण झालीत. ३ मार्च २००९ रोजी पाकिस्तानामधील लाहोर इथे एक अशी घटना घडली होती, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले होते. या दिवशी पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता.
या भीषण हल्ल्याने संपूर्ण क्रीडा जगत हादरले होते. तसेच या घटनेचे पडसाद बराच काळ उमटत होते. या हल्ल्यामुळे कित्येक वर्ष पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने देखील स्थगित झाले होते. या हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या लेखात आपण या भयावह घटनेचा आढावा घेऊया.
मैदानावर जात असताना झाला हल्ला
पाहुणा श्रीलंकेचा संघ लाहोरच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी बसमधून निघाला होता. त्यावेळी मैदानाजवळच्या एका चौकात दहशतवाद्यांनी बस हेरून अंदाधुंद गोळीबार सुरु केला. हे दहशतवादी दोन गाड्यांमधून आले होते. गाड्या थांबवून त्यातून उतरून त्यांनी गोळीबार सुरु केला होता. त्यांनी रॉकेट आणि हँड ग्रेनेडने देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
कसे वाचले खेळाडू?
दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु करताच सगळे खेळाडू बसमध्ये आपापल्या सीट खाली झुकले. दहशतवाद्यांच्या गोळ्या बसच्या काचा फोडून आत घुसत होत्या. मात्र श्रीलंकन संघाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा पथकांनी प्रत्युतर द्यायला सुरुवात केली आणि खेळाडूंची बस मैदानात पोहोचवली. काही खेळाडू जखमी झाले. मात्र या भयावह हल्ल्यात सुदैवाने कोणत्याही खेळाडूचा जीव गेला नाही. मात्र सुरक्षा पथकातील काही जणांना मात्र आपल्या प्राणाला मुकावे लागले. या घटनेनंतर लगेचच सामना रद्द करण्यात आला.
काही खेळाडू झाले गंभीर जखमी
रिपोर्टनुसार या हल्ल्यात बसवर सुमारे ३५ गोळ्यांचे निशाण सापडले होते. अनेक गोळ्या काचा फोडून आत शिरल्या होत्या. एक गोळी महेला जयवर्धनेच्या अगदी जवळून गेली होती. तर कुमार संगकाराच्या खांद्यालाही एक गोळी चाटून गेली होती. मात्र थरंगा परनविथाना हा खेळाडू सर्वाधिक गंभीर जखमी झाला होता. त्याच्या छातीत गोळी लागली होती. थिलन समरवीराच्याही पायाला गोळी लागली होती.
दौरा तातडीने झाला रद्द
या हल्ल्याने संपूर्ण विश्वात खळबळ उडाली होती. श्रीलंकन संघाने या हल्ल्यानंतर लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकन खेळाडूंना घेऊन जाणारी बस मैदानात पोहोचल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी पुढे तिथे हेलीकॉप्टर बोलावण्यात आले होते. जिथून खेळाडूंना थेट विमानतळावर घेऊन जाण्यात आले होते. श्रीलंकेचा दौरा तर तातडीने स्थगित करण्यात आलाच होता, मात्र या भयावह घटनेनंतर अनेक वर्षे कुठल्याही संघाने पाकिस्तानचा दौरा करणे टाळले होते.
मागील एक-दोन वर्षांत काही संघांनी पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे. मात्र अजूनही संघांचे प्रमुख खेळाडू पाकिस्तान दौऱ्यात सहभागी होण्यासाठी फारशे उत्सुक नसतात. त्यामुळे हा हल्ला पाकिस्तान क्रिकेटला अजूनही महागात पडतो आहे.
महत्वाच्या बातम्या:
वाढदिवस विशेष: पाकिस्तानचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करणारा ‘इंझमाम-उल-हक’
विराट १०० वा कसोटी करणार खास? ३८ धावा करताच सचिन, द्रविड, सेहवागच्या पंक्तीत बसण्याची संधी
‘पचनाची गोळी, सणांत होळी आणि फलंदाजीत कोहली’, सेहवागकडून १०० कसोटी खेळणाऱ्या विराटचे कौतुक