---Advertisement---

२०११ विश्वचषकात घरी बसवलेला क्रिकेटर ते टीम इंडियाचा हिटमॅन, पहा रोहितचा १३ वर्षांचा प्रवास

On: मंगळवार, जून 23, 2020 12:04 PM
---Advertisement---

मुंबई । हिटमॅन रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. आज रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून तेरा वर्षे पूर्ण झाली आहेत. स्थानिक क्रिकेटमधल्या आपल्या टॅलेंटने रोहितने साऱ्यांनाच प्रभावित केले होते. त्याच्यातील क्षमता पाहून निवड समितीने 2007 साली त्याला राष्ट्रीय संघात स्थान दिले. 

23 जून 2007मध्ये आयर्लंड विरुद्धच्या झालेल्या वनडे सामन्यातून रोहितने पदार्पण केले, पण फलंदाजीची संधी त्याला मिळाली नाही. पहिली सहा वर्षे त्याची संघर्षातच गेली. आपल्या फलंदाजीने त्याला छाप टाकता आली नाही. तरीही निवड समिती आणि संघव्यवस्थापन त्यांच्या पाठीशी राहिले. 2007 ते 2013 पर्यंत त्याने 81 वनडे सामन्यात 30.43 च्या सरासरीने 1978 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला 2011 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघातही संधी मिळाली नव्हती.

पण रोहितने नंतर पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले. त्यानंतर कर्णधार एमएस धोनीने रोहित शर्मावर 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नियमीत सलामीवीर म्हणून जबाबदारी दिली.

आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ करत रोहितनेही अनेक धडाकेबाज खेळी केल्या. सलामीची जबाबदारी मिळाल्यानंतर रोहित शर्माने पुन्हा पाठीमागे वळून कधीच पाहिले नाही. सलामीची जबाबदारी मिळाल्यानंतर रोहित शर्माने आपले ‘टॅलेंट’ जगाला दाखवून दिले. जून 2013 पासून रोहितने 134 वनडे सामने खेळला असून  59.74 च्या सरासरीने 7050 धावा केल्या. यात 27 शतके आणि 30 अर्धशतके ठोकली. तो सलामीचा फलंदाज बनताच गोलंदाजांसाठी एक कर्दनकाळ ठरला.

आपल्या बॅटने दिग्गज गोलंदाजांची गोलंदाजी फोडून काढली. अनेक अविश्वसनीय विक्रमांना गवसणी घातली. फलंदाजीतील सातत्य पाहून निवड समितीने त्याच्या खांद्यावर मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाची उपकर्णधारपदाची जबाबदारीही दिली. वनडे क्रिकेटमध्ये एक नव्हे तर तब्बल तीन तीन द्विशतक ठोकले. यात श्रीलंकेविरुद्ध दोन तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका द्विशतकाचा समावेश आहे. 2014 साली कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची ऐतिहासिक खेळी केली. वनडे क्रिकेटमधली आतापर्यंतची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

रोहित शर्माच्या भात्यात अनेक राजस फटके आहेत. गोलंदाजांवर हवाई फायर करण्यात तो माहीर आहे. वनडेमध्ये एकाच डावात सर्वाधिक 16 षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 244 षटकार ठोकले आहेत. तसेच वनडेमध्ये आठवेळा दीडशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये 35 चेंडूत शतक ठोकत डेव्हिड मिलरच्या विक्रमाशी बरोबरी केली. टी20 मध्ये त्याने चार शतके ठोकली.

रोहित शर्माने पहिल्या दोन कसोटीत दोन शतके ठोकणारा हा तिसरा फलंदाज आहे. यासोबतच त्याने आपल्या पहिल्या कसोटी मालिकेत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कारही जिंकला होता. असा विक्रम यापूर्वी चार भारतीय खेळाडूंनी केला होता. 2019 ला विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक केले. असा विक्रम करणारा तो सहावा भारतीय खेळाडू आहे. तसेच एकाच कसोटीत सर्वाधिक 13 षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे. एकाच कसोटी मालिकेत 19 षटकार ठोकण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे.

वाचनीय लेख – 

रोहित शर्माने असे वाजवले तेराचे बारा, म्हणून झाला हिटमॅन

पाकिस्तान दौरा केलेला एकमेव क्रिकेटपटू आजही खेळतोय टीम इंडियाकडून

किस्से क्रिकेटचे २- २६/११ झाले नसते तर श्रीलंकेऐवजी सचिन, द्रविड व धोनीवर झाला असता हल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---