2 एप्रिल हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अतिशय खास आहे. 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये याच दिवशी भारतीय संघानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर कब्जा केला होता. 1983 साली भारत कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच विश्वविजेता बनला होता. 28 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं पुन्हा इतिहास रचला. एकदिवसीय विश्वचषक दोन किंवा अधिक वेळा जिंकणारा भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियानंतरचा तिसरा संघ आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या त्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. श्रीलंकेनं 6 गडी गमावत 274 धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाकडून महेला जयवर्धनेनं 103 धावांची खेळी केली. तर कर्णधार कुमार संगकारानं 48 आणि नुवान कुलसेकरानं 32 धावांचं योगदान दिलं. भारताकडून झहीर खान आणि युवराज सिंगनं प्रत्येकी 2 बळी घेतले.
275 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीलाच झटके बसले. टीम इंडियाच्या अवघ्या 31 धावांत 2 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर 114 धावांच्या स्कोअरवर टीम इंडियानं विराट कोहलीची विकेट गमावली. तेव्हा सलामीवीर गौतम गंभीर क्रीजवर होता आणि त्याला साथ देण्यासाठी युवराज सिंग येणार असं वाटत होतं. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं सर्वांना चकित केलं. तो स्वत: युवराज सिंगच्या आधी क्रीझवर आला. धोनीनं स्फोटक खेळी खेळली आणि 10 चेंडू शिल्लक असताना भारताला विजय (277/4) मिळवून दिला. धोनी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.
महेंद्रसिंग धोनीनं गौतम गंभीरसोबत चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. त्यानंतर युवराज सिंगच्या साथीनं त्यानं पाचव्या विकेटसाठी नाबाद 54 धावांची भागीदारी केली. गौतम गंभीरनं 97 धावांची (122 चेंडू, 9 चौकार) दमदार खेळी खेळली. धोनीनं केवळ 79 चेंडूंत 91 धावा (8 चौकार, 2 षटकार) ठोकल्या. यासह त्यानं विजयी षटकार ठोकून आपलं नाव इतिहासात अजरामर केलं. धोनीनं वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या चेंडूवर हा षटकार मारला होता. युवराज 24 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा विश्वचषक होता. त्यामुळे हे विजेतेपद त्याच्यासाठी खास भेट होतं. सचिनचं लहानपणापासूनचं जगज्जेतं होण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण स्टेडियमचा फेरफटका मारला.
संपूर्ण विश्वचषकात युवराज सिंग, सचिन तेंडुलकर आणि झहीर खान जबरदस्त फॉर्ममध्ये होते. युवराजची ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवड करण्यात आली. त्यानं संपूर्ण स्पर्धेत बॉल आणि बॅटनं खळबळ उडवून दिली होती. युवराजनं वर्ल्ड कपमध्ये 362 धावा केल्या आणि 15 विकेट्सही घेतल्या. सचिन तेंडुलकरनं टीम इंडियासाठी सर्वाधिक 482 धावा केल्या. तर झहीर खाननं सर्वाधिक 21 बळी घेतले.
भारतानं अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून अनेक रेकॉर्ड मोडले. भारत विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान संघ ठरला. याआधी कोणत्याही संघानं स्वतःच्या भूमीवर विश्वचषक जिंकला नव्हता. यानंतर भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे संघही आपापल्या भूमीवर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरले.
लक्ष्याचा पाठलाग करताना चॅम्पियन बनणारा भारत तिसरा संघ ठरला. याआधी विश्वचषकाच्या इतिहासात असं केवळ दोनदाच घडलं होतं. याशिवाय याआधी अंतिम फेरीत शतक झळकावणाऱ्या खेळाडूचा संघच विजयी होत होता. मात्र 2011 च्या विश्वचषकात महेला जयवर्धनेनं नाबाद 103 धावा करूनही श्रीलंकेला विजय मिळू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम
मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये रचला इतिहास, आजपर्यंत कोणताही संघ हा पराक्रम करू शकला नाही
जोस बटलरनं आपलं नाव बदललं, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत घोषणा