---Advertisement---

…आणि शाहबाज नदीमची १५ वर्षांपासूनची प्रतिक्षा १४ तासात संपली

On: शनिवार, ऑक्टोबर 19, 2019 12:01 PM
---Advertisement---

रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या सामन्यातून भारताकडून 30 वर्षीय शहाबाज नदीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

तो भारताकडून कसोटीत पदार्पण करणारा 296 वा खेळाडू ठरला आहे. त्याला या कसोटीसाठी 11 जणांच्या संघात इशांत शर्मा ऐवजी संधी मिळाली आहे.

विशेष म्हणजे नदीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 15 जणांच्या भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. परंतू तिसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव खांद्याच्या दुखापतीने बाहेर पडल्याने त्याची बदली खेळाडू म्हणून काल(18 ऑक्टोबर) संध्याकाळी 7 च्या दरम्यान निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

या निवडीनंतर आज 14 तासांनंतर लगेचच त्याला 11 जणांच्या भारतीय संघातही संधी मिळाली आहे. त्याला भारताचा कर्णधार विराट कोहलीने टेस्ट कॅप दिली.

फिरकी गोलंदाज असलेल्या शहाबाज नदीमने 15 वर्षांपूर्वी डिसेंबर 2004 मध्ये झारखंडकडून केरळ विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 2 विकेट्स आणि 25 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्या सामन्यात झारखंडकडून भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीही खेळत होता.

नदीमने मागील 15 वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. तसेच त्याने भारत अ संघाकडून खेळतानाही चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे.

त्याने आत्तापर्यंत 110 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 424 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने फलंदाजी करताना 2131 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. तसेच त्याने 106 अ दर्जाच्या सामन्यात 145 विकेट्स घेतल्या आहेत.

मागील 15 वर्षांत देशांतर्गत क्रिकेट गाजवलेला नदीम आज त्याच्याच घरच्या मैदानावर कसोटी पदार्पण करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---