भारतात सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने झारखंडविरुद्ध खेळताना आज(16 ऑक्टोबर) द्विशतक झळकावले आहे. याबरोबरच अनेक विक्रम केले आहेत.
त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईकडून 154 चेंडूत 203 धावांची खेळी करताना 17 चौकार आणि 12 षटकार मारले. विशेष म्हणजे त्याचे आज वय 17 वर्षे 292 दिवस आहे. त्यामुळे अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचे देशांतर्गत क्रिकेटपटू ऍलन बारॉ यांच्या नावावर होता. त्यांनी 20 वर्षे 276 दिवसांचे असताना नताल संघाकडून खेळताना अफ्रिकन एकादश संघाविरुद्ध ऑक्टोबर 1975 मध्ये नाबाद 202 धावांची खेळी केली होती.
त्याचबरोबर यशस्वी हा अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा भारताचा सातवा क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी भारताच्या सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन, कर्ण कौशल आणि संजू सॅमसन यांनी अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतके केली आहेत. यातील शिखर, कर्ण आणि सॅमसनने यांनी देशांतर्गत स्पर्धेत तर सचिन, सेहवाग आणि रोहितने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही द्विशतके केली आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी 2019 विजय हजारे ट्रॉफीमध्येच सॅमसनने केरळकडून खेळताना गोवा विरुद्ध नाबाद 212 धावांची खेळी केली होती.
तसेच यशस्वी हा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत द्विशतक करणारा सॅमसन आणि कौशल नंतरचा तिसराच फलंदाज ठरला आहे. कौशलने उत्तराखंडकडून खेळताना कर्णने सिक्कीम विरुद्ध मागीलवर्षी 202 धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर यशस्वीने यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हे तिसरे शतक झळकावले आहे. त्याच्या आता या विजय हजारे ट्रॉफीमध्ये 5 सामन्यात 100.80 च्या सरासरीने 504 धावा झाल्या आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतून यशस्वीने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
आज त्याने झळकावलेल्या द्विशतकामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 बाद 358 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून यशस्वीव्यतिरिक्त आदित्य तरेने 78 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सिद्धेश लाडने 32 आणि कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 31 धावा केल्या.
झारखंडकडून विविकानंद तिवारीने 2 आणि अंकुल रॉयने 1 विकेट घेतली.
मुंबईने झारखंडसमोर विजयासाठी 50 षटकात 359 धावांचे आव्हान ठेवले आहे.