---Advertisement---

19 वर्षे आणि अनेक रेकॉर्ड्स! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास

dhoni 148
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आजपर्यंत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली. एवढेच नाही तर तो भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारही झाला. त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने 2011 चा वनडे विश्वचषक, 2007चा टी20 विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही विजेतीपदे मिळवली. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवले होते.

पण या सर्वात 23 डिसेंबर हा धोनी आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास दिवस आहे. कारण याच दिवशी त्याने 19 वर्षांपूर्वी (19 Years Ago Debut) म्हणजेच 23 डिसेंबर, 2004 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच निमित्ताने आपण आज त्याच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

भारताचा दिग्गज माजी कर्णधार धोनी प्रवासाबद्दलची ही थोडक्यात माहिती –  

-धोनी त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच आपल्या षटकारांसाठी चर्चेत राहिला होता. आपल्या यष्टीरक्षणापेक्षाही तो आपल्या विस्फोटक फलंदाजी आणि लांब केसांमुळे प्रसिद्धीस येत होता.

-2003-04 मध्ये धोनी इंडिया ‘अ’ संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून झिंबाब्वे (Zimbabwe) आणि केनियाच्या (Keniya) दौऱ्यावर गेला होता. हा दौरा धोनीच्या कारकिर्दीमधील महत्त्वाचा टप्पा ठरला.

केनियाच्या दौऱ्यावर भारत ‘अ’ (India A) आणि पाकिस्तान ‘अ’ (Pakistan A) संघात खेळलेल्या त्रिकोणीय मालिकेत धोनीने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या मालिकेतील 6 डावात त्याने 72.40 च्या सरासरीने 362 धावा केल्या होत्या. त्यात 2 शतकांचा समावेश होता.

त्याची दोन्हीही शतकं पाकिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध आली होती. धोनीच्या या कामगिरीमुळे त्यावेळचा भारताचा कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) खूप प्रभावित झाला आणि त्यानंतर धोनीला 23 डिसेंबर 2004 ला बांग्लादेशविरुद्ध भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी धोनी वनडेत पदार्पण करणारा भारताचा 157 वा खेळाडू ठरला होता.

-जगातील उत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक असणाऱ्या धोनी आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्य धावांवर बाद झाला होता. बांग्लादेशविरुद्ध पहिल्याच सामन्यात 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला धोनी पहिल्याच चेंडूत धावबाद झाला होता.

https://twitter.com/BCCI/status/1294887193844957186

-विशाखापट्टणमच्या मैदानावर 2004-05 मध्ये पाकिस्तानविरुद्ध धोनी आपल्या कारकिर्दीमधील 5 वा सामना खेळत होता. त्यावेळी त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्यावेळीचा कर्णधार गांगुलीने पाठवले होते. तेव्हा धोनीने 148 धावांची तूफानी खेळी करत पहिले शतक झळकावले होते. या सामन्यात धोनीने 15 चौकार आणि 4 षटकार ठोकले होते.

https://twitter.com/BCCI/status/1294888083947548672

-वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर 2005 मध्ये धोनीला भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचा फायदा घेत कारकिर्दीतील 5 व्या कसोटीत फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्धच 148 धावा केल्या होत्या. हे धोनीचे पहिले कसोटी शतक होते.

https://twitter.com/BCCI/status/1294892505406648320

-2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघ 299 धावांचा पाठलाग करत होता. तेव्हा, या सामन्यात धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 145 चेंडूत नाबाद 183 धावा केल्या होत्या आणि भारताला हा सामना जिंकून दिला होता. नाबाद 183 ही धोनीची वैयक्तिक सर्वोच्च वनडे धावसंख्या आहे. तसेच ही धावसंख्या जगातील कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाने केलेल्या धावसंख्येपेक्षा सर्वोच्च धावसंख्या आहे.

https://twitter.com/BCCI/status/1294890630452150272

-2005 मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) हे सामना पाहण्यासाठी आले होते. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती धोनीच्या लांब केसांची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. यावेळी त्यांनी धोनीला केस न कापण्याचा सल्ला दिला होता.

-धोनीने सर्वात आधी 2007 ला झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले होते. या विश्वचषकात भारताने विजेतेपदही मिळवले होते. त्यानंतर त्याला वनडे आणि कसोटी संघाचेही कर्णधारपद देण्यात आले होते.

https://twitter.com/BCCI/status/1294896459226025984

– मार्च 2009 मध्ये धोनीने पहिल्यांदा भारताला न्यूझीलंडमध्ये द्विपक्षीय वनडे मालिकेत कर्णधार म्हणून विजय मिळवून दिला.

– सन 2009 मध्येच धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांचा भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला होता. डिसेंबर 2009 पासून भारतीय संघ 600 दिवस कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम होता.

https://twitter.com/BCCI/status/1294918536087781381

-टी20 (T20) विश्वचषकानंतर भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात वनडे विश्वचषकही जिंकला होता. 2011मध्ये भारताने वनडे विश्वविजेतेपद मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला (Sri Lanka) पराभूत करून जिंकले होते.

1983 नंतर भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वविजेता होण्याचा मान त्यावेळी भारताने मिळविला होता.

-2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. त्याने अंतिम सामन्यात नाबाद 91 धावांची खेळी केली होती. तसेच 97 धावा करणाऱ्या गौतम गंभीरबरोबर 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती.

https://twitter.com/BCCI/status/1294923831329472512

-मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीने आतापर्यंत 350 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 98 टी20 सामन्यात त्याने 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत.

-याबरोबरच धोनीने 90 कसोटी सामने खेळताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके आणि 33 अर्धशतकांसह 4976 धावा केल्या आहेत. त्याने डिसेंबर 2014मध्ये कसोटीमधून निवृत्ती स्विकारली आहे.

-याचबरोबर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे 829 विकेट्स घेतल्या आहेत. तो यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे.

-4 जुलै, 2010 ला धोनीने साक्षी रावतसोबत विवाह (Marry With Sakshi) केला. या दांम्पत्याला फेब्रुवारी 2015मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. त्याच्या मुलीचे नाव झिवा आहे.

– धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे 2019 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या उपांत्य सामना धोनीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.

विशेष म्हणजे धोनी त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात धावबाद झाला होता आणि तो त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही धावबाद झाला.

– आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही धोनीने आयपीएलमध्ये खेळणे सुरू ठेवले. 2021 आयपीएल हंगामात त्याने आपल्या नेतृत्वाची झलक पुन्हा एकदा दाखवत, चेन्नईला चौथे विजेतेपद मिळवून दिले. यानंतर, टी20 विश्वचषकात त्याने भारतीय संघाच्या मेंटरची भूमिका निभावली. आयपीएल 2023मध्ये धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने आयपीएल ट्रॉफी जिंकली. आगामी आयपीएल हंगामात देखील धोनी सीएसकेसाठी कर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव का बाहेर झाला? उमेश यादवने सांगितले कारण
“कुलदीपला वगळणे योग्यच”, संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाला दिग्गजाचा पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---