---Advertisement---

पवारांच्या बारामतीत रणजी सामना खेळणार विश्वविजेता कर्णधार

On: सोमवार, फेब्रुवारी 10, 2020 4:00 PM
---Advertisement---

भारतात सध्या रणजी ट्रॉफीचा 86 वा हंगाम सुरु आहे. या हंगामातील नववी फेरी 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना उत्तराखंड संघाविरुद्ध बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर होणार आहे.

बारामतीमध्ये खेळवण्यात येणारा हा पहिलाच रणजी सामना आहे. बीसीसीआयने या स्टेडियमवर सामने आयोजित करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता बारामतीकरांना क्रिकेट सामन्यांचा स्टेडियममध्ये उपस्थित राहुन आनंद घेता येणार आहे.

यापुर्वी कोकण, नाशिक तसेच औरंगाबादला रणजी स्पर्धेचे सामने झाले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनचे गहुंजे येथे हक्काचे मैदान झाल्यानंतर तर पुणे सोडून बाहेरच्या शहरात किंवा जिल्ह्यांच्या ठिकाणी रणजी सामने होणे जवळपास बंदच झाले होते. तरीही गेल्या हंगामात नाशिक शहराला एक सामना आयोजनाचा मान मिळाला होता.

आता हे सामने टियर 1 आणि टियर 2 शहरांतून तालुके तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी जात असल्यामुळे रणजी सामने पहायला प्रेक्षक पुन्हा वाढू शकतात. कर्नाटकचे रणजी सामने गेली काही वर्षे तीन-चार ठिकाणी होतात. यामुळे क्रिकेटच्या प्रचार प्रसारात याची मदतच होते.

Screengrab: bcci.tv/

बारामतीमध्ये होणाऱ्या या रणजी सामन्याचे उद्घाटन आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सामन्यादरम्यान बारामतीकरांना 2012 चा 19 वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार उन्मुक्त चंद यालाही खेळताना पहाण्याची संधी मिळणार आहे. तो उत्तराखंड संघाचा कर्णधार आहे.  त्याने भारत विरुद्ध बांगलादेश 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात समालोचनही केले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र संघातही स्फोटक फलंदाज राहुल त्रिपाठी, युवा प्रतिभावान ऋतुराज गायकवाड,  तब्बल 100 प्रथम श्रेणी सामने खेळलेला अंकित बावणे असे स्टार खेळाडू आहेत.

हा सामना पहाण्यासाठी बारामतीकरांना विनामुल्य खूला असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सामन्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.

या स्टेडियमबद्दल थोडक्यात-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे उद्घाटन एप्रिल 2016मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते झाले होते. त्यावेळी शरद पवार, भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, माजी क्रिकेटपटू अजित आगरकर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, खासदार सुप्रीया सुळे, पांडुरंग साळगावकर, रवी सावंत उपस्थित होते. महाराष्ट्रात तालुक्याच्या ठिकाणी क्रिकेटसाठी सोयीसुविधांनी परिपुर्ण हे पहिलेचं स्टेडियम आहे.

Photo Courtesy: Facebook/Baramati Cricket stadium

https://twitter.com/Maha_Sports/status/1226804326451924992

https://twitter.com/Maha_Sports/status/1226793334955397120

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---