क्रिकेटमध्ये एका फलंदाजांसाठी शतकाचे महत्त्व किती असते हे सर्व क्रिकेटप्रेमी जाणतात. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण केले आहे. त्याचवेळी, तो तब्बल ३० वेळा नव्वदीत बाद झाला आहे. ‘नर्वस नाईन्टीज’ ची (९० ते ९९ धावांच्या दरम्यान) शिकार होणे कोणत्याही फलंदाजांसाठी सर्वात दुर्दैवी घटना असते.
आयपीएलमध्ये ख्रिस गेल, ब्रेंडन मॅक्युलम, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, एबी डिव्हिलियर्स यासारख्या मातब्बर खेळाडूंनी दोन पेक्षा जास्त शतके झळकावली आहेत. अनेक खेळाडू ‘नर्वस नाईन्टीज’ चे शिकार देखील ठरले आहेत. यात, ग्लेन मॅक्सवेल, शिखर धवन, रिषभ पंत, सौरव गांगुली हे खेळाडू नव्वदीत बाद झाले होते. मात्र, असे दोन खेळाडू आहेत जे दुर्दैवीरित्या ९९ धावांवर नाबाद राहिले आहेत.
आज त्याच दोन कमनशिबी खेळाडूंविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) सुरेश रैना
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू म्हणून सुरेश रैनाला ओळखले जाते. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ या टोपण नावाने देखील संबोधण्यात येते.
रैनाने २०१३ च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ९९ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात चेन्नई सुपरकिंग्जने ३ गडी गमावत २२३ धावा उभारल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर शतक झळकावण्यासाठी रैनाला ५ धावांची आवश्यकता होती पण तो फक्त चौकार मारू शकला. अशाप्रकारे तो नाबाद ९९ धावा काढून तंबूत परतला. रैनाने या खेळीत ५२ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकार ठोकले होते. प्रत्युत्तरात, हैदराबादला १४८ धावा करता आल्या आणि चेन्नईने सामना आपल्या नावे केला.
२) ख्रिस गेल
टी२० क्रिकेटचा पहिला सुपरस्टार म्हणून ख्रिस गेल ओळखला जातो. गेलच्या नावे टी२० मध्ये तब्बल २१ शतके आहेत. आयपीएलमध्ये देखील गेलने ६ शतके आपल्या नावे केली आहेत. जगभरातील टी२० लीगमध्ये सर्वाधिक मागणी असणाऱ्या खेळाडूंमध्ये गेलचा समावेश होतो.
२०१९ आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना आरसीबी विरुद्ध गेल ९९ धावांवर नाबाद राहिला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना गेल ६४ चेंडूत ९९ धावा करू शकला. त्याच्या खेळीच्या बळावर पंजाबने ४ बाद १७३ धावा उभारल्या होत्या. त्यानंतर, आरसीबीने दोन गडी गमावून आव्हान सहजरित्या पार केले.