भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. कर्णधार शुबमन गिलनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्यात आले. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि खलील अहमद प्लेइंग इलेव्हनचा भाग बनले आहेत.
जयस्वाल, दुबे आणि सॅमसन पहिल्या दोन सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत, रियान परागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर साई सुदर्शननं टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. मात्र तिसऱ्या सामन्यासाठी या दोघांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता रियान पराग आणि साई सुदर्शन यांना भविष्यात पुन्हा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होईल की नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता परागला कदाचित या मालिकेत पुन्हा खेळण्याची संधी मिळणार नाही, कारण संघात दुबेसारखा अनुभवी खेळाडू परतला आहे. आयपीएल 2024 मधील चांगल्या कामगिरीनंतर या दोन्ही खेळाडूंचा राष्ट्रीय संघात समावेश झाला आहे. रियान पराग पहिल्या सामन्यात केवळ 2 धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात त्यानं फलंदाजी केली नव्हती. पदार्पणाच्या सामन्यात लवकर आऊट झाल्यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. तर साई सुदर्शनला खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही.
मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेनं 13 धावांनी जिंकला होता. त्यानंतर भारतानं दुसरा सामना 100 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. दुबे, जयस्वाल आणि सॅमसन सारख्या खेळाडूंच्या आगमनानं टीम इंडिया खूप मजबूत दिसत आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन – शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला WTC विजेतेपद मिळवून देईल हा स्टार खेळाडू, 6 वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा कसोटी सामना
कोहली-रोहित नव्हे तर या फलंदाजाला गोलंदाजी करणं अवघड जातं, जेम्स अँडरसनचा खुलासा
टी20 क्रमवारीत ऋतुराज गायकवाडची मोठी झेप, शतकवीर अभिषेक शर्माचीही धमाकेदार एंट्री