झहीर खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांना धडकी भरवणारा गोलंदाज होता. झहीर खानने गोलंदाजीत स्विंग, स्पीड आणि रिव्हर्स स्विंगमुळेही जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले आहेत. झहीर खान नवीन आणि जुन्या चेंडूने गोलंदाजी करण्यात पटाईत होता. त्याच्याविरुद्ध खेळताना जागतिक क्रिकेटमधील फलंदाजांनाही त्रास सहन करावा लागला. क्रिकेटनंतर झहीर खान आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका साकारतानाही दिसत आहे.
२०११ मध्ये विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघात झहीर खानने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याशिवाय २००३ च्या विश्ववचषकामध्येही त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्येही झहीर खानने बर्याच वेळा आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. परंतु आज या लेखात आपण झहीर खानच्या गोलंदाजीबद्दल नव्हे तर फलंदाजीबद्दल चर्चा करण्यात आहोत.
झहीर खाननेही आपल्या कारकीर्दीतील काही प्रसंगी फलंदाजी करताना उत्तम कामगिरी दाखविली आहे. झहीर खान हा डावखुरा गोलंदाज असून तो कसोटी क्रिकेट मधील ११ व्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज आहे. या लेखात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीतून केलेल्या २ विक्रमांबद्दल सांगण्यात आले आहे.
गोलंदाज झहीर खानने केले फलंदाजीतून दोन विक्रम
शेवटच्या षटकात २७ धावा करणारा एकमेव फलंदाज
झहीर खानने आपल्या फलंदाजीदरम्यान वनडे क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग चार षटकार लगावले आहेत. २००० मध्ये त्याने जोधपूर येथील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात हेनरी ओलंगाच्या गोलंदाजीवर चार षटकार ठोकले होते. वनडे क्रिकेटमधील अंतिम षटकात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. या षटकात त्याने एकूण २७ धावा केल्या जो या भारतीय खेळाडूच्या नावावर विक्रम आहे. मात्र, या फलंदाजीनंतरही भारतीय संघाला त्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
११ व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा एकमेव भारतीय खेळाडू
झहीर खानने ११ व्या क्रमांकावर खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने अकराव्या क्रमांकावर फलंदाजी करत ७५ धावांची खेळी केली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर त्याच्या सोबत खेळत होता. त्या सामन्यात सचिन तेंडुलकरने दुहेरी शतक झळकावले होते. हा झहीरचा विक्रम अबाधित आहे आणि अजून अन्य कोणताही भारतीय फलंदाज असे करू शकला नाही.