मुंबई । भारताचा सलामीचा फलंदाज केएल राहुल मागील वर्षी एका कार्यक्रमात महिलांविषयक वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर बीसीसीआयने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राहुलला निलंबित केले होते. राहुलच्या मते, “या निलंबनामुळे माझे विचार बदलले. परिणामी कामगिरीत सातत्य येऊ लागले.”
केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी “कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण भारतात त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. बीसीसीआयच्या प्रशासक समितीने त्यांच्यावर कारवाई केली. ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू असतानाच त्यांना मायदेशी परत बोलवून घेण्यात आले होते.
राहुल म्हणाला की, ” 2019 नंतर मी वेगळ्या प्रकारचा विचार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझे प्रदर्शन सुधारण्यास मदत झाली. ते निलंबन आणि त्यानंतर जे काही झालं तेव्हा मी स्वार्थी होण्याच्या विचारात होतो आणि स्वतःसाठी खेळण्याचा विचार केला, पण मी त्यात अयशस्वी झालो. त्यानंतर मी स्वतःच ठरवले की, मला ते करायचे जे आपल्या संघाला पाहिजे.”
राहुल म्हणाला की, “एका चॅम्पियन संघाचा सदस्य बनून राहताना आणि स्वतःच्या खेळात बदल केल्याने माझ्यावरचा दबाव पूर्णपणे निघून गेला. मी रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. मागील काही वर्षात त्यांच्या सोबत सलामीला खेळलो. त्याने माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आहे. अनेक कठीण प्रसंगात त्याने माझी बाजू घेतली. माझ्या पाठीमागे तो भक्कमपणे उभा राहिला. तो मला नेहमी सहकार्य करतो. त्याच्यामुळे माझे मनोबल खूपच वाढले.”
या प्रकरणानंतर राहुल वनडे क्रिकेटमध्ये ऋषभ पंतच्या जागी यष्टीरक्षण करू लागला. मागील पाच वनडे सामन्यात 75.75 च्या सरासरीने 303 धावा केल्या. तर टी-20 मध्ये 56.00 च्या सरासरीने 224 धावा केल्या. या प्रकरणानंतर राहुलला कळाले की, क्रिकेटरची कारकीर्द किती छोटी असते. त्यानंतर त्याने आपली सर्व शक्ती योग्य दिशेने वाटचाल करण्यास लावली.