इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) पाहण्याची मजाच वेगळी असते. कारण, दर्शकांना यामध्ये आपल्या आवडत्या भारतीय आणि परदेशी खेळाडूंना एकमेकांसोबत किंवा एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायची संधी मिळते. महत्त्वाचे म्हणजे, आयपीएल सामन्यांमध्ये षटकांची मर्यादा असल्यामुळे फलंदाज दमदार फटकेबाजी करत धावा जमा करतात. तर, गोलंदाज फलंदाजांच्या ताबडतोब खेळीला आडवण्याचा प्रयत्न करत अनेकांना तंबूचा रस्ता दाखवतात.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांविषयी बोलायचं झाले तर, हा विक्रम किंग्स इलेव्हन पंजाबच्या धुरंदर फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. तो आपल्या सर्वाधिक ३२६ षटकारांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर, त्याच्या पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या एबी डिविलियर्सने आपला क्रमांक लावला आहे. तो २१२ षटकारांसह यादीत दूसऱ्या स्थानावर आहे.
या २ परदेशी खेळाडूंनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत क्रमांक लागतो तो भारतीय फलंदाजांचा. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आपल्या २०९ षटकारांसह या यादीत तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या १९४ षटकारांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे. तर, मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने (१९४ षटकार) पाचवे स्थान पटकावले आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत टॉप-५मध्ये असलेले हे सर्व फलंदाज यंदाही षटकारांचा वर्षाव करत आपल्या या आकड्यांमध्ये वाढ करताना दिसतील. पण, या फलंदाजांव्यतिरिक्त गतवर्षीच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-५मध्ये असणारे काही फलंदाज, आयपीएलच्या तेराव्या हंगामातही आपला जलवा दाखवताना दिसू शकतात.
या लेखात, आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक षटकार मारु शकणाऱ्या त्या ३ फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. तर जाणून घेऊयात…
आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-५मध्ये येऊ शकणारे ३ फलंदाज (3 Batsman Who Might Win Most Sixes Award In IPL 2020) –
रिषभ पंत (Rishabh Pant)
दिल्ली कॅपिटल्सचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या मोठमोठे शॉट्स मारण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. तो अनेक दमदार गोलंदाजांच्या गोलंदाजीवरही षटकार जडताना दिसतो. आयपीएल २०१९मध्ये त्याने १६ सामन्यात २७ षटकार मारले होते. यासह तो दिल्ली संघातून पूर्ण हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा अव्वल क्रमांकाचा आणि आयपीएलमधील चौथा फलंदाज ठरला होता.
जर युएईच्या मैदानावर पंतचा हा विस्फोटक फॉर्म टिकला, तर नक्कीच तो यावर्षीदेखील पूर्ण हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-५ मध्ये येईल.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा त्याने खेळलेल्या आयपीएलच्या प्रत्येक हंगामात ताबडतोब फलंदाजी करताना दिसला आहे. यापुर्वी युएईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यांमध्येही मॅक्सवेलने तूफानी फलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने ५ सामने खेळत ३ वेळा ९०च्या जवळपास धावांचा स्कोर करत एकूण ३०० धावांची कामगिरी केली होती.
त्यामुळे तो यंदाही युएईच्या मैदानावर अशीच ताबडतोब खेळी करत, आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक धावा आणि षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील होऊ शकतो.
आंद्रे रसल (Andre Russell)
कोलकाता नाईट रायडर्सचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसल हा सध्या फॉर्ममध्ये आहे. गतवर्षीही त्याने आपल्या दमदार शॉट्स मारण्याच्या क्षमतेने संघाला कित्येक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला होता. आयपीएलच्या १२व्या हंगामात त्याने केवळ १४ सामन्यात ५२ षटकार मारले होते. यासह तो पूर्ण हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान होता.
युएईच्या सावकाश खेळपट्टीवरदेखील तो त्याची विस्फोटक फलंदाजी दाखवताना दिसेल आणि यंदाही सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावेल.
ट्रेंडिंग लेख-
-विराटच्या आरसीबीला पराभवाची धूळ चारण्यासाठी हैद्राबादचा वॉर्नर उतरेल ‘या’ ११ शिलेदारांसह
-लिलावात न विकले गेलेले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर्स म्हणु शकतात ‘मी पुन्हा येईन’!
-यंदा आयपीएल पदार्पणातच हे ३ युवा फलंदाज ‘ऑरेंज कॅप’ चे आहेत प्रमुख दावेदार
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रॉड म्हणतो, या इंग्लंडच्या क्रिकेटरला वनडेत तोड नाही!
-तो ठरणार बीग बॅश लीगमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय क्रिकेटर!
-चुकिला माफी नाही, विराटच्या आरसीबीच्या एका चुकिला राजस्थानने केले नाही माफ