खरं तर आयपीएलच्या लोकप्रियतेत भारतीय खेळाडूंचे मोठे योगदान आहे. आयपीएल जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते. पैसा आणि नाव आयपीएल दरम्यान खेळाडूंना मिळतो. पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांतील खेळाडू देखील आयपीएलमध्ये खेळून आपले नाव कमावतात.
आयपीएल म्हणजे युवा खेळाडूंना आपल्या देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे एक माध्यम आहे. या माध्यमातूनच बरेच खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघात सामील झाले आहेत. आयपीएलमध्ये खेळणे ही मोठी गोष्ट तर आहेच आणि संधी मिळाल्यावर त्यामध्ये शतक ठोकणे ही आणखी एक मोठी गोष्ट आहे. मनीष पांडे हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्यांच्यानंतर अनेक भारतीय खेळाडू शतकी खेळी करण्यात यशस्वी झाले. परदेशी खेळाडूंमध्ये ब्रेंडन मॅक्यूलमने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. असेही काही भारतीय खेळाडू आहेत जे शतक झळकल्यानंतर लोकप्रिय झालेत.
पण या सर्वांमध्ये असे काही महान भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी कधीही आयपीएलमध्ये शतक ठोकलेले नाही. त्यापैकी ३ महान खेळाडूंचा उल्लेख या लेखात आहे.
गौतम गंभीर (Gautam Gambhir)
गौतम गंभीर याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २ वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. गौतम गंभीर आयपीएलमध्ये एकूण अकरा हंगाम खेळला आणि या दरम्यान त्याने १५४ सामन्यात ४२१७ धावा केल्या आहेत. यात त्याने ३६ अर्धशतके झळकावली मात्र तो शतक झळकावण्यात अपयशी ठरला. त्याची ९३ ही सर्वोच्च धावसंख्या होती. आयपीएल कारकिर्दीमध्ये गौतम गंभीर १७ वेळा नाबाद राहिला.
केकेआरव्यतिरिक्त त्याने दिल्ली कॅपिटल्सचेही नेतृत्व केले परंतु संघाच्या खराब कामगिरीमुळे त्याने आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर त्याने निवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीची जागा जिंकून तो खासदार झाला.
युवराज सिंग (Yuvraj Singh)
‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने आयपीएलमध्ये एकही शतक केले नाही. त्याने आयपीएलचे १२ हंगाम खेळले आणि १३२ सामन्यात २७५० धावा केल्या. या दरम्यान त्याने त्याच्या फलंदाजीतून १३ अर्धशतके झळकावली. आयपीएलमध्ये त्याची ८३ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजीत ३६ बळीही घेतले. त्यात त्याने दोन वेळा ४ बळी घेतले. त्याला आयपीएलमध्ये शेवटचा सामना मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली.
एमएस धोनी (MS Dhoni)
फिनिशर म्हणून ओळखला जाणाऱ्या एमएस धोनीलाही आयपीएलमध्ये शतक ठोकता आलेले नाही. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघातून सुरुवातीपासूनच खेळत आहे. एमएस धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९० सामन्यांत ४४३२ धावा केल्या आहेत. यात त्याने २३ अर्धशतके झळकावली असून नाबाद ८३ अशी त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. एमएस धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जला ३ वेळा आयपीएल विजेता बनवले आहे. त्याच्या चाहत्यांना आगामी मोसमात त्याच्या फलंदाजीतून नक्कीच शतकाची अपेक्षा असेल.