भारतीय क्रिकेट संघाने १९३२ साली पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून भारताने एकूण ५३२ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला १५७ सामन्यांमध्ये विजय, तर १६७ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. याव्यतिरिक्त २१७ सामने अनिर्णित राहिले, तर एक सामना बरोबरीत सुटला. भारतीय संघाने १५७ विजयांपैकी काही सामने एकतर्फी जिंकले. तर काही सामने खूपच रोमांचकारी झाले. यात भारताने निसटता विजय मिळवला.
भारताचा कमी धावांनी विजय
भारतीय संघाने कमी धावसंख्येच्या अंतराने मिळवलेल्या विजयांचा विचार केला, तर हा विक्रम १३ धावांचा असून २००४ मध्ये मुंबई कसोटीत ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवला होता. इंग्लंडचा १९७२ साली कोलकाता कसोटीत २८ धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाविरूध्द २०१८ मध्ये ऍडलेड कसोटीत भारताने ३१ धावांनी विजय मिळवला होता.
भारताचा जास्त धावांनी विजय
भारताचा जास्त धावांच्या फरकाने मिळवलेल्या विजयांचा विचार केला, तर हा विक्रम ३३७ धावांचा असून, दिल्ली कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. डावाच्या दृष्टीने विचार केला, तर २०१८ मध्ये राजकोट कसोटीत वेस्ट इंडीजचा एक डाव आणि २७२ धावांनी पराभव केला होता. भारतीय संघाने कसोटीत आतापर्यंत ८ वेळा १० विकेट्स राखून विजय मिळवला आहे.
आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत, भारतीय संघाने १ किंवा २ विकेट्स राखून मिळवलेल्या रोमांचकारी विजयांबाबत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१ विकेट, मोहाली २०१०)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान २०१० मध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. मोहालीत झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने शेन वॉटसन (१२६), टीम पेन (९२) आणि रिकी पाँटिंग (७१) धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने ४२८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने सचिन तेंडुलकर (९८), सुरेश रैना (८६), राहुल द्रविड (७७), आणि वीरेंद्र सेहवाग (५९) यांच्या अर्धशतकांच्या बळावर ४०५ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाला २३ धावांची आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियन फलंदाजी दुसऱ्या डावात अपयशी ठरली. संपूर्ण संघ १९२ धावांत बाद झाला. भारताला विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताची सुरूवातही निराशाजनक झाली. एकवेळ ४८ धावांवर ४ विकेट्स पडले होते. पाहुण्यांनी यजमानांना ठराविक अंतराने असेच धक्के देत १२४ धावांवर ८ विकेट्स अशी बिकट अवस्था केली. भारताला समोर पराभव दिसत होता. परंतु लक्ष्मणने नाबाद ७३ धावांची खेळी करत एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला. त्याने इशांतसोबत ९ विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. इशांत बाद झाल्यावर प्रज्ञान ओझाला सोबत घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात ८ विकेट्स मिळविणाऱ्या झहीर खानला (Zaheer Khan) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२ विकेट्स, मुंबई १९६४)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान १९६४ साली ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. मुंबईत खेळण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३२० धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल भारताने कर्णधार नवाब पतौडी, विजय मांजरेकर व एम. एल. जयसिम्हा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३४१ धावा करत २१ धावांची आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २७४ धावांवर आटोपला. भारताला २५४ धावांचे लक्ष्य मिळाले.
दुसऱ्या डावात नवाब पतौडी (Nawab Pataudi) आणि दिलीप सरदेसाई (Dilip Sardesai) यांनी अर्धशतके झळकावली. ८ विकेट्स गमावत भारताने कसोटी सामना जिंकला. सामन्यात भारताकडून भागवत चंद्रशेखर ८ आणि बापू नाडकर्णीने ६ विकेट्स मिळवले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२ विकेट्स, चेन्नई २००१)
२००१ मधील कसोटी मालिका ऐतिहासिक ठरली होती. मुंबईमधील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने कोलकाता कसोटीत अविस्मरणीय विजय मिळवला होता. चेन्नई कसोटी अगोदर मालिका १-१ बरोबरीत होती. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली.
सलामीवीर मॅथ्यू हेडनने व्दिशतक (२०३) झळकावूनसुध्दा ऑस्ट्रेलियाला फक्त ३९१ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारताकडून सचिन तेंडुलकरने शतक (१२६) आणि शिवसुंदर दास, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सदागोपन रमेश यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५०१ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात १२० धावांची आघाडी मिळवली.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २६४ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात ७ विकेट्स मिळवणाऱ्या भज्जीने दुसऱ्या डावातही ८ विकेट्स घेतल्या. भारताला १५५ धावांचे लक्ष्य मिळाले. व्हीव्हीएस लक्ष्मण (६६) आणि तळात समीर दिघेच्या नाबाद (२२) धावांच्या बळावर ८ विकेट्स गमावून सामना जिंकत मालिकेवरही नाव कोरले. हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि मॅथ्यू हेडनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.