क्रिकेटमध्ये अनेक असे विक्रम आहेत, जे फार दुर्मिळ आहे. तसेच ते क्रिकेट इतिहासात क्वचितच झालेले पाहायला मिळतात. त्यातीलच एक विक्रम म्हणजे ६ चेंडूत ६ षटकार. आत्तापर्यंत केवळ ३ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा कारनामा करता आला आहे. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजून काही क्रिकेटपटूंनी हा पराक्रम केला आहे.
नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारण्याच्या या यादीत नव्याने वेस्ट इंडिडचा किरॉन पोलार्ड हा सामील झाला आहे. त्याने ३ मार्चला श्रीलंकेविरुद्ध अकिला धनंजयाच्या षटकात ६ चेंडूत ६ षटकार ठोकले. त्याच्याआधी २ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा केला आहे. तर एकूण ४ जणांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये असा कारनामा केला आहे. या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊ.
१. सर गॅरी सोबर्स (Sir Gary Sobers)
क्रिकेटविश्वातील सर्वात महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स यांनी, सर्वप्रथम सलग सहा षटकार मारण्याचा कारनामा केला होता. इंग्लिश कौंटी क्लब नॉटिंघमशायरसाठी खेळताना ग्लॅमॉर्गन कौंटी क्लबच्या माल्कम नॅश यांना ३१ ऑगस्ट १९६८ रोजी सलग सहा चेंडूवर सहा षटकार ठोकले होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे कामगिरी करणारे ते पहिले खेळाडू होते.
२. रवी शास्त्री (Ravi Shastri)
भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील १९८५ साली मुंबई संघाकडून खेळताना बडोद्याच्या तिलकराज यांच्या गोलंदाजीवर सहा षटकार ठोकले होते. असा विक्रम करणारे ते जगातील केवळ दुसरे तर पहिले भारतीय खेळाडू होते. याच खेळीचा दरम्यान त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम आपल्या नावे केला होता.
३. हर्षल गिब्स (Herschelle Gibbs)
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज हर्षल गिब्स हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि वनडे क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला होता. २००७ च्या विश्वचषकादरम्यान नेदरलँडच्या डॅन वॅन बंग या फिरकीपटूच्या एकाच षटकात गिब्स यांनी सलग सहा षटकार मारले होते.
४. युवराज सिंग (Yuvraj Singh)
२००७ च्या टी२० विश्वचषकामधील भारत विरुद्ध इंग्लंड साखळी सामन्यात, भारताच्या युवराज सिंग याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला सलग सहा षटकार खेचत टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. याच सामन्यात अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक झळकाविण्याचा विश्वविक्रम देखील त्याने केला. आजतागायत कोणत्याही फलंदाजाला त्याचा हा विक्रम मोडता आलेला नाही.
५. एलेक्स हेल्स (Alex Hales)
इंग्लंडचा विस्फोटक सलामीवीर एलेक्स हेल्स याने टी२० ब्लास्ट या स्पर्धेत खेळताना सलग सहा षटकार ठोकण्याची कामगिरी केली आहे. त्याने नॉटिंघमशायर संघासाठी खेळताना वॉर्विकशायरचा गोलंदाज बॉयड रॅन्कीन याच्या षटकात सलग सहा षटकार मारले होते.
६. हजरतुल्ला झझाई (Hazratullah Zazai)
साल २०१८ मध्ये अफगाणिस्तान प्रीमीयर लीगमध्ये काबुल झ्वानन या संघाकडून खेळत असताना झझाईने ६ चेंडूत ६ षटकार मारण्याची कामगिरी बाल्ख लिजन्ड्सविरुद्ध केली होती. त्याने या सामन्यात बाल्ख लिजन्ड्सचा गोलंदाज अब्दुल्ला मझारीने टाकलेल्या तिसऱ्या षटकात हे ६ षटकार मारले.
७. रॉस व्हिटली (Ross Whiteley)
इंग्लंडमध्ये २०१७ साली टी२० ब्लास्ट स्पर्धेत वॉर्सेस्टरशायरकडून खेळताना रॉस व्हिटली यांने यॉर्कशायरविरुद्ध खेळताना एका षटकात ६ षटकार मारण्याचा कारनामा केला होता. त्याने कार्ल कार्व्हर या डावकरी फिरकीपटूविरुद्ध हे ६ षटकार मारण्याचा कारनामा केला होता.
वाचनीय लेख –
असे ‘३’ खेळाडू जे घेऊ शकतात बुमराह- भुवनेश्वर- शमी या भारतीय संघाच्या तिकडीची जागा
दिवसा कसोटी सामना खेळून रात्री पार्कमध्ये रात्र काढायचा ‘हा’ टीम इंडियाचा भीडू