भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 40 वा वाढदिवस आहे. त्याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. असे असले तरी एमएस धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून मानला जातो. भारताने टी20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वनडे विश्वचषक धोनीच्याच नेतृत्वाखाली जिंकला. धोनीच्या शांत आणि संयमी स्वभावाने अनेकदा वाईट परिस्थितीत भारताला तारून नेले आहे.
धोनीने आपल्या कारकिर्दीत अनेक आश्चर्यजनक निर्णय घेतलेले आहेत. ज्याचा टीमला प्रचंड फायदा झाला. जे कोणाच्याच डोक्यात येणार नाही अश्या गोष्टी करून धोनीने अनेकदा इतरांना विचारात पाडले आहे.
तर जाणून घेऊयात धोनीचे आश्चर्यचकित करणारे 3 निर्णय….
3. टी-२० विश्वचषकाच्या बॉल आउटमध्ये रॉबिन उथप्पाला गोलंदाजी देणे
पाकिस्तानविरुद्ध २००७ च्या टी-२० विश्वचषकात सामना टाय झाल्यावर धोनीने बाॅल आऊटवेळी अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळाडूंचा विचार केला आणि हरभजन सिंग व वीरेंद्र सेहवागसमवेत रॉबिन उथप्पाला गोलंदाजी दिली. त्याने स्टंपचा अचूक वेध घेत भारताला गुण मिळवून दिला. दुसरीकडे पाकिस्तानच्या बाजूने कोणीही नीट निशाणा न साधल्याने भारताने हा सामना बॉल आउटमध्ये जिंकला.
2. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला देणे
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी १३ धावा हव्या होत्या. धोनीने वेगळीच चाल खेळत मध्यमगती गोलंदाज जोगिंदर शर्माला गोलंदाजी दिली. मिसबाह उल हकने त्याला षटकार खेचून ही निवड चुकीची ठरवण्याचा प्रयत्न केला पण धोनीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जोगींदर शर्माने मिसबाह उल हकची विकेट घेतली व भारताने पहिला वाहिल्या टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले.
1. चेतेश्वर पुजाराला कसोटी पदार्पणात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे
चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघाचा कणा म्हणून सर्वज्ञात आहे. पण त्याचे कसोटी पदार्पण जरासे डळमळीतच झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१० ला पुजाराने कसोटी पदार्पण केले, पण पहिल्या डावात तो फारशी चमक दाखवू शकला नाही. दुसऱ्या डावात धोनीने पुजाराला अचानक बढती देत द्रविडच्या आधी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला पाठवले. याचा अनपेक्षित फायदा होऊन पुजाराने ७२ धावा केल्या, ज्यामुळे त्याच्या आत्मविश्वासही वाढला. त्यानंतर भारताने हा कसोटी सामना जिंकून बॉर्डर-गावसकर ट्राॅफी मालिकेमध्ये आघाडी घेतली होती.