-अशुतोष रत्नपारखी
फार पूर्वी… म्हणजे जेव्हा क्रिकेटमधील शेवटचे दोन भयाकारी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श आणि सर कर्टली अॅम्ब्रोस नावाचे क्रिकेट खेळायचे तेव्हाची गोष्ट. त्यातला सर कर्टली अॅम्ब्रोस अधिक भीषण होता, फलंदाजांची तंतरायची त्याला बघूनच, उरलेलं काम त्याची दाहक गोलंदाजी करायची. वॉल्श अधिक सर्जिकल होता, सुरेख तसेच सहज अॅक्शन आणि भेदकता हे त्याचे गुणविशेष! तर सांगायचं हे की, क्रिकेटमधील सर्वांगसुंदर आणि फलंदाजांनी देखील आदरार्थी नाव घ्यावी अशी ही शेवटची विंडीज, कदाचित जागतिक, गोलंदाजी जोडगोळी!
वॉल्शने ५१९ कसोटी बळींचा विक्रम केला तेव्हा क्रिकेतजगत थांबलं होतं. त्याला म्हटलं गेलं, “Take a bow, sir!” सगळ्यांनीच म्हटलं, सचिन म्हटला असेल, लारा म्हटला असेल, मॅकॅग्रा देखील म्हटला असेल! पुढे दोन व्यवसायिक स्पिन जादूगारांनी ही कसोटी बळींची कमान अजून उंचावली. कोण वेगवान गोलंदाज हे विक्रम मोडेल किंवा काही ठराविक पातळीपर्यंत तरी पोहोचेल हे बराच काळ अवघड वाटत असताना, जेम्स अँडरसनने काल सहाशे कसोटी बळी मिळवून नवा विक्रम रचलाय!
जेम्स म्हणजे जातिवंत इंग्लिश वेगवान गोलंदाज, वेगापेक्षा त्याचा स्विंगवर अधिक विश्वास. त्याचे चेंडू हवेत कधी सपकन तर कधी हळुवार स्विंग होताना बघणे हे सुंदर दृश्य असते. त्याने विश्वचषकात डर्बनमध्ये खेळताना केलेला पाकिस्तानी संघाचा संहार केवळ प्रेक्षणीय होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इंग्रजांना त्यांच्या मूळ “विचारसरणीचा” गोलंदाज जेम्सच्या रुपात भेटला! फ्लिंटॉफ, हार्मीसन किंवा होगार्ड हे गोलंदाजीचा इंग्लिश डोलारा कसेबसे सांभाळत. जेम्स अँडरसनच्या आगमनानंतर त्याला एक प्रकारचा रेखीव बाज आला.
त्याची अॅक्शन “अतीव सुंदर” या सदरात मोडते. असे म्हणतात, ग्रेट मायकेल होल्डिंग जेव्हा रन अप घ्यायचा तेव्हा त्याची तुलना रोल्स रॉईस गाडीच्या धावण्याशी व्हायची! जेम्स मला त्याचा त्या बाबतीत उत्तराधिकारी वाटतो. पुढे होगार्ड, हार्मीसन वगैरे निवृत्त झाल्यावर तो सातत्याने इंग्लंडसाठी कसोटीमध्ये उपलब्ध राहिला, हाही एक प्रकारचा इंग्लिश विक्रम असेल. नंतर त्याला स्टुअर्ट ब्रॉडची साथ लाभली. दोघांनी मिळून अनेक इंग्लिश आणि आंतरराष्ट्रीय विक्रम मोडले आणि नवे प्रस्थापित केले. कसोटीमध्ये १००० बळींची भागीदारी हा असाच एक अचाट विक्रम दोघांच्या नावावर आहे.
जेम्स अँडरसन एखाद्या अस्सल क्रिकेटपटू प्रमाणे रमला तो कसोटीतच! त्याने २०१५ पासून एकदिवसीय क्रिकेट थांबवले. कसोटी कारकीर्द वाढवणे हे कारण त्यामागे असेल. ट्वेन्टी-ट्वेन्टी नामक आचरटपणा त्याच्या रक्तातच नसावा! २००३ मध्ये पदार्पण केल्यापासून जेम्स इंग्लंडसाठी १५६ कसोटी खेळालाय, कोणत्याही दृष्टीने हे अद्वितीय आहे. त्याने कसोटीमध्ये ३३,००० हुन अधिक चेंडू टाकले आहेत! त्या खेळताना केवळ २.८५ चा इकॉनॉमी रेट आणि २६.८ इतकी भन्नाट सरासरी असणे हे “येरा गबाळ्याचे काम नोहे!” तिथे पाहिजे जातीचे, जेम्स सारखे!
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा आफ्रिकन खेळपट्ट्यांवर जेम्सची भेदकता अधिक धारदार व्हायची. समोर रिकी पॉंटिंग असो अथवा राहुल द्रविड किंवा जॅक कॅलिस असो त्याचा सर्वांनाच समान न्याय असायचा! एखादा फलंदाज सुखासुखी उभा राहून बॅटिंग करत असताना, जेम्स येतो गोलंदाजीला, मग अचानक स्विंग होत आत आलेला चेंडू खेळताना होणारी त्याची तारांबळ बघणे हे देखील मजेशीर असते. त्यानंतर एखादा अफलातून स्विंग चेंडू येतो आणि फलंदाजाचं दांडकं उडवून जातो, जेम्स मग मधुर हास्य करत आनंद व्यक्त करतो! कित्येक वर्षे असेच होत आलंय.
जेम्स कधीच पोकळ आक्रमकता दाखवत नाही, त्याचा स्वतःच्या गोलंदाजीवरचा विश्वास त्यातून लक्षात येतो. पोकळ आक्रमकतेने आपल्या कलेचा अपमान होईल असे काहीसे वाटत असेल त्याला.!
जेम्स आला तेव्हा आणि आज क्रिकेट आमूलाग्र बदललंय. अनेक लीग, ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धा, दोन वर्षांनी होणारे टुकार ट्वेन्टी विश्वचषक वगैरेंच्या भडिमारात तंदुरुस्ती टिकवणे अवघड असते, त्यामुळे कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे हे कळावे लागते. जेम्सला ते पुरते ठाऊक आहे. म्हणूनच तर टिकला आहे तो! सतरा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हे साधे काम नाही आणि त्यात वेगवान गोलंदाजांच्या जातीला तर नाहीच! ते जेम्सने साध्य केले आणि ते करताना सहाशे बळींचा किर्तीमान प्रस्थापित केलाय! आला तेव्हा चेहऱ्यावर खट्याळपणा बरोबर गोडवा देखील होता त्याच्या, आता अनुभवातून आलेले शहाणपण झळकते.
सहाशे कसोटी बळी! इथून पुढे कोणाला हे जमेल असे दिसत नाही! सहाशे कसोटी बळी इझ गोइंग टू बी अ मिराज फॉर फास्ट बोलर्स फ्रॉम नाऊ ऑन! यामुळे एक गोष्ट मात्र नव्याने मांडावी लागेल. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच क्रिकेट प्रेमींच्या मनात मॅकॅग्रा, वॉल्श, अॅम्ब्रोस, ली या सगळ्यांचा पगडा मोठा होता. म्हणजे श्रेष्ठ गोलंदाज म्हटले की ही नवे डोळ्यासमोर येतात. त्यांचे कर्तृत्व निःसंशय मोठे, पण आता त्यात बदल करावा लागेल. आता त्यात एक नाव तितक्याच आदराने आणि सहजतेने घ्यावे लागेल, जेम्स अँडरसन! सर्वकालीन सर्वश्रेष्ठांच्या पंगतीत एक नवा नरश्रेष्ठ येऊन बसलाय… मानाने… आदराने कोणताही गाजावाजा न करता, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता!
ट्रेंडिंग लेख –
अगदी धोनीसहित या दिग्गजांच्या नशीबात टी२०त कधीही नव्हती मॅन ऑफ द मॅच
असे ३ क्रिकेटर, जे पुण्याच्या दोन वेगवेगळ्या आयपीएल टीमकडून खेळले क्रिकेट
शेवटच्या १० ओव्हरमध्ये धु- धु धुणारे जगातील ५ क्रिकेटपटू
महत्त्वाच्या बातम्या –
नुकतेच २६७ धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाच्या वडिलांविषयी पसरली अफवा, खरं काय ते घ्या जाणून
अश्विन पाँटिंगसोबत फोनवर नेमकं काय बोलला? यावेळी होणार खुलासा
अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय गोलंदाज म्हणतोय, माझी बायकोसुद्धा आहे या अवॉर्डची दावेदार