ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 19 धावांनी पराभूत केले. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे हा सामना खेळला गेला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 294 धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 9 बाद 275 धावाच करू शकला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवुडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
ऑस्ट्रेलियाच्या 295 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्या इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब होती. त्यांनी 57 धावात 4 बळी गमावले होते. जोश हेजलवुडने जेसन रॉय (3) आणि जो रूटला (1) बाद केले. त्यानंतर अॅडम झांपाने कर्णधार इयन मॉर्गनला (23) व जोस बटलरला (1) झेलबाद केले.
इंग्लंडचे 6 फलंदाज दहाच्या आकड्यापर्यंतही जाऊ शकले नाहीत
सॅम बिलिंग्जने 118 धावा केल्या आणि वनडे कारकीर्दीतील पहिले शतक झळकावत इंग्लंडचा डाव सावरला होता. त्याच्याशिवाय सलामीवीर जॉनी बेअरस्टोनेही 107 चेंडूंत 84 धावा फटकावल्या. परंतु इतर फलंदाजांकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. इंग्लंडचे सहा फलंदाज दहाच्या आकड्यालाही स्पर्श करु शकले नाहीत. संघ 9 बाद 275 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झांपाने 4 आणि जोश हेजलवुडने 3 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नर आणि फिंच स्वस्तात झाले बाद
त्याचबरोबर नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवातही चांगली नव्हती. त्यांनी 43 धावांत 2 खेळाडूंच्य विकेट्स गमावल्या होत्या. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 6 आणि कर्णधार ऍरोन फिंच 16 धावा करुन लवकर बाद झाला. मार्नस लबूशेनही चांगली कामगिरी करू शकला नाही आणि 21 धावांवर तो तंबूत परतला.
मार्श आणि मॅक्सवेलने झळकावले अर्धशतक
त्यापाठोपाठ मार्कस स्टोईनिस (43), मिशेल मार्श (73) आणि ग्लेन मॅक्सवेल (77) यांनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत पोहचवले. मार्शने वनडे कारकीर्दीचे 12 वे आणि मॅक्सवेलने 20 वे अर्धशतक झळकावले. दोघांनी सहाव्या गाड्यासाठी 126 धावांची भागीदारी केली.
त्याचवेळी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांनी 3-3 गडी बाद केले. आदिल रशीदला 2 आणि ख्रिस वॉक्सला 1 गडी मिळाला.
डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे स्मिथ पहिला सामना नाही खेळू शकला
स्टीव्ह स्मिथविना ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात उतरला. सरावाच्या वेळी स्मिथच्या डोक्याला दुखापत झाली. याच कारणास्तव, खबरदारी म्हणून त्याने पहिला वनडे सामना खेळला नाही.
तथापि, स्मिथ पुढचा सामना खेळणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. तो फिट नसल्यास, त्याच्या जागी पर्याय शोधावा लागेल.
इंग्लंडविरुद्ध 5 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्याची संधी
ऑस्ट्रेलिया 5 वर्षानंतर यजमानांविरुद्ध वनडे मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आहे. अखेरच्या वेळी ऑस्ट्रेलियाने 5-वनडे सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला 3-2 असे सप्टेंबर 2015 मध्ये त्यांच्या घरी पराभूत केले होते .
यानंतर दोन्ही संघांदरम्यान दोन वनडे मालिका झाल्या आणि ऑस्ट्रेलियाला या दोन्ही मालिकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तथापि, पहिला सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियाच्या मालिका जिंकण्याची आशा वाढली आहे.
41 वर्षानंतर एकाच ठिकाणी तीन वनडे सामने
दोन्ही देशांमधील तीनही वनडे सामने मँचेस्टरमध्ये खेळले जात आहेत. हे 41 वर्षानंतर घडत आहे, जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सलग तीन सामने एकाच ठिकाणी खेळले जात आहेत.