गुरुवारी (29 ऑक्टोबर) आयपीएल 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नईचा हा या हंगामातील 5 वा विजय आहे. चेन्नईच्या या विजयात ऋतुराज गायकवाड आणि रविंद्र जडेजाने महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबरच या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवल्याने चेन्नईने एक खास विक्रम केला आहे.
आयपीएलमध्ये चेन्नईने सहाव्यांदा धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. त्यामुळे चेन्नई हा सर्वाधिक वेळा शेवटच्या चेंडूवर धावांचा पाठलाग करताना सामने जिंकणारा संघ ठरला आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला मागे टाकले आहे. मुंबईने 5 वेळा असा कारनामा केला आहे.
सर्वाधिक वेळा शेवटच्या चेंडूवर धावांचा पाठलाग करताना सामने जिंकणारे संघ
6- चेन्नई सुपर किंग्ज
5- मुंबई इंडियन्स
4 – राजस्थान रॉयल्स
3- किंग्ज इलेव्हन पंजाब
2- दिल्ली कॅपिटल्स
1- केकेआर, आरसीबी, एसआरच, डेक्कन, पुण, गुजरात
असा केला चेन्नईच्या फलंदाजांनी धावांचा पाठलाग –
या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला 173 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 4 विकेट्स गमावून 20 षटकात पूर्ण केला. चेन्नईकडून शेन वॉटसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामीला फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. मात्र 50 धावांची सलामी भागीदारी रचल्यानंतर वॉटसन 14 धावांवर बाद झाला.
त्यानंतर अंबाती रायुडूने ऋतुराजला चांगली साथ द्यायला सुरुवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भक्कम भागीदारी रचली. पण खेळपट्टीवर स्थिरावलेला असतानाच रायडू 38 धावांवर माघारी फिरला. त्याच्यापाठोपाठ लगेचच वरुण चक्रवर्तीने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीला 1 धावेवर त्रिफळाचीत केले.
त्यामुळे चेन्नई अडचणी सापडते की काय असे वाटू लागले असतानाच ऋतुराजही 53 चेंडूत 72 धावांची शानदार अर्धशतकी खेळी करुन बाद झाला. त्याच्या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. तो बाद झाला तेव्हा चेन्नईला 16 चेंडूत 32 धावांची गरज होती.
यावेळी रविंद्र जडेजाने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने आक्रमक फलंदाजी केली. शेवटच्या 2 चेंडूवर चेन्नईला 7 धावांची गरज असताना जडेजाने सलग 2 षटकार ठोकत चेन्नईचा विजय निश्चित केला. जडेजाने 11 चेंडूच 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या. तर सॅम करनने नाबाद 13 धावा केल्या.
कोलकाताकडून गोलंदाजीत पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्तीलाच विकेट्स घेण्यात यश आले. या दोघांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
कोलकाताकडून नितीश राणाची चमकदार कामगिरी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाकडून नितीश राणाने 61 चेंडूत 87 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त कोलकाताच्या फलंदाजांना खास काही कामगिरी करता आली नाही. केवळ शुबमन गिल(26) आणि दिनेश कार्तिक(21) यांनाच 20 धावांचा आकडा पार करता आला. त्यामुळे कोलकाताने 20 षटकात 5 बाद 172 धावा केल्या.
चेन्नईकडून गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मिशेल सँटेनर, रविंद्र जडेजा आणि सॅम करनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
Video : मिस्ट्री स्पिनरच्या जाळ्यात अडकला धोनी; हंगामात दुसऱ्यांदा झाला बोल्ड
Video : ‘त्यांना भेटायला उत्सुक आहे’ अँजिओप्लास्टी झाल्यानंतर कपिल देव यांनी व्यक्त केली इच्छा
धोनीने बटलर, पंड्यां बंधुंनंतर कोलकाताच्या दोन खेळाडूंनाही दिली जर्सी भेट, पाहा फोटो






