ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईत निधन झाले. जोन्स स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आले होते. ते ५९ वर्षांचे होते.
डीन जोन्स हे सक्रिय क्रिकेट विश्लेषक होते. सध्या युएईमध्ये सुरूअसलेल्या आयपीएलमध्ये टेलिव्हिजनवर समालोचन करण्यासाठी स्टार स्पोर्ट्ने त्यांच्याशी करार केला होता. जोन्स हे भारतीय प्रसारमाध्यमांतील एक लोकप्रिय व्यक्ती होत. त्यांचा ‘प्रोफेसर डिनो’ हा एनडीटीव्हीवरील कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय होता. ते जगभरातील विविध लीगमध्ये समालोचन करत. जोन्स आपल्या स्पष्ट व परखड टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध होते.
मेलबर्न येथे जन्मलेल्या जोन्स यांनी ऑस्ट्रेलियासाठी ५२ कसोटीत ४६.५५ च्या सरासरीने ३,६६१ धावा काढल्या. त्यांच्या नावे ११ आंतरराष्ट्रीय कसोटी शतके होती. ऍलन बॉर्डरच्या यांच्या संघाचे ते महत्त्वपूर्ण सदस्य मानले जात. जोन्स यांनी १६४ एकदिवसीय सामने खेळत सात शतके आणि ४६ अर्धशतकांच्या मदतीने ६,०६८ धावा केल्या. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वात पहिल्यांदा यशस्वी ठरलेल्या खेळाडूंपैकी ते एक होते. ऑस्ट्रेलियाने १९८७ मध्ये जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकावेळी ते ऑस्ट्रेलियन संघाचे सदस्य होते.