जागतिक क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघाचा दबदबा आहे. अलीकडच्या काळात भारतीय संघाने हे सिद्ध केले आहे की ते केवळ देशातच नाही तर परदेशातही विजय मिळवू शकतात.
भारतीय संघ आज विश्व क्रिकेटमध्ये ज्या स्थानावर आहे, त्याचे श्रेय भारताच्या काही महत्त्वाच्या कर्णधारांना जाते, ज्यांच्या नेतृत्वाखाली एकामागून एक सरस कामगिरी करत संघ या यशाच्या शिखरावर आला आहे.
आज आपण अशा चार कर्णधार विषयी जाणून घेऊया ज्यांच्या कल्पक नेतृत्वामुळे भारतीय क्रिकेट यशाच्या रथावर आरूढ झाले आहे.
१) कपिल देव
माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटच्या यशस्वीतेचा पाया रचला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कपिल देवच ते पहिले भारतीय कर्णधार होते ज्यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकला. १९८३ मध्ये भारतीय संघाने दोन वेळचा गतविजेता वेस्ट इंडीजचा ३४ धावांनी पराभव करून ही स्पर्धा जिंकली. या विजयामुळे भारतातील क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल झाला.
सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यासारख्या दिग्गजांचे म्हणणे आहे की, कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकल्यापासून आम्ही देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. येणाऱ्या पिढीला प्रेरणा देण्यासह कपिल यांनी अष्टपैलू खेळाडूचे महत्त्व क्रिकेटमध्ये किती आहे हे सप्रमाण दाखवून दिले
आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, कपिल यांनी ३४ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यात चार विजय आणि सात पराभवासोबत तब्बल २३ सामने अनिर्णित राखण्याची कामगिरी केली होती. एकदिवसीय प्रकारात कर्णधार म्हणून कपिल यांनी ७४ सामने खेळत, ३९ सामने जिंकवून दिले तर ३३ सामन्यांत संघाला पराभव पत्करावा लागला.
२) सौरव गांगुली
भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधांराची यादी करत असताना, त्यात सौरव गांगुलीचे नाव नसणे अशक्य आहे. सौरव भारतीय क्रिकेटच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक होता. भारतीय क्रिकेटच्या बदलात गांगुलीचे अमूल्य योगदान आहे. सौरव गांगुलीने भारतीय संघाला परदेशात जिंकायला शिकवले. २००० मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर गांगुलीने कर्णधारपदाची सूत्रे हातात देत भारतीय संघाला सातत्याने यशाकडे नेण्याचे काम केले.
गांगुलीने युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना अधिकाधिक संधी दिल्या. गांगुलीने निवडलेले हरभजन, युवराज, सेहवाग, झहीर, धोनी हे खेळाडू पुढे जाऊन दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाले.
२००१ ची बॉर्डर-गावसकर मालिका जिंकवून देत विश्व क्रिकेटला भारताची नव्याने ओळख त्याने करून दिली. २००२ साली, इंग्लंडमध्ये जाऊन नेटवेस्ट ट्रॉफी जिंकण्याचे मोठे कार्यदेखील गांगुलीच्या नेतृत्वात पार पडले. त्याचवर्षी, भारत श्रीलंकेसोबत संयुक्तरीत्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला. तसेच २००३ च्या विश्वचषकात गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. गांगुलीने ४९ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करताना २१ विजय मिळवून दिले त्यातील ११ विजय परदेशातील होते.
३) एमएस धोनी
गांगुली नंतर या यादीत एमएस धोनीचा क्रमांक लागतो. धोनी फक्त भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर भारतीय क्रिकेटला इतरांच्या तुलनेत अनेक पावले पुढे नेण्याचे काम केले.
धोनी आपल्या शांत डोक्याने निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा दबावाच्या वेळी धोनीने अचूक निर्णय घेत संघाला विजयी केलेले दिसून येते. धोनीने गांगुली प्रमाणे युवा खेळाडूंना संधी देत त्यांच्याकडून सर्वात्तम कामगिरी करून घेतली. गांगुलीने सुरू केलेली यशाची परंपरा धोनीने आपल्या कर्णधारपदाच्या काळात जोपासली.
धोनीच्या नेतृत्वात लागोपाठ मिळवलेल्या यशामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा दरारा निर्माण झाला. त्याच्या नेतृत्व करण्याच्या अनोख्या शैलीमुळे त्याचे जगभरात चाहते तयार झाले. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकल्या. भारताला कसोटी क्रमवारीत पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवून देण्याचे काम देखील धोनीने केले.
४) विराट कोहली
भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा देखील या यादीत समाविष्ट आहे. कोहली जितका चांगला फलंदाज आहे त्याचप्रमाणे कर्णधारही तितकाच शानदार आहे. कोहलीने आपल्या संघ सहकाऱ्यांत बेधडक खेळण्याची व कायम जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याची वृत्ती रुजवली. विराटमुळे प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यात जिंकण्यासाठीची धडपड दिसून येते.
कोहलीने आपल्या स्वतःच्या फिटनेसने संघ सहकारीच नव्हे तर भारतातील तमाम युवकांना फिटनेसचे महत्व पटवून दिले आहे. फलंदाजीत नवनवे विक्रम स्थापित करत असताना कोहलीने नेतृत्व करतानासुद्धा चांगले कार्य केले आहे.
कोहलीच्या नेतृत्वात भारत २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. जवळपास गेले ३ वर्षे कोहलीच्या नेतृत्वात भारत कसोटीमध्ये अव्वल स्थानावर होता.
ट्रेंडिंग लेख –
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश
आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी
आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं
महत्त्वाच्या बातम्या-
जन्माष्टमीच्या खास प्रसंगी ‘कॅप्टन कूल’ धोनी वाजवतोय बासरी; व्हिडिओ झाला व्हायरल
मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे
मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा