क्रिकेट हा नेहमीपासूनच अनिश्चिततेचा खेळ राहिला आहे. या खेळात कधी काय होईल, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच २०१९ सालचा विश्वचषक. ज्यामध्ये अंतिम सामन्याचा निर्णय नाही झाला आणि इंग्लंडला न जिंकताच विजेतेपद बहाल केले. तसेच, क्रिकेट इतिहासात अनेक असे विक्रम झाले आहेत, ज्यांबद्दल कोणी विचार करू शकत नव्हते. जेव्हा वनडे क्रिकेटची सुरुवात झाली होती, तेव्हा कोणीही विचार केला नसेल की २० षटकांच्या क्रिकेट प्रकारात कोणताही फलंदाज शतक ठोकू शकतो.
क्रिकेट इतिहासात अनेक रोमांचक विक्रमांपैकी एक असा विक्रम झाला आहे, ज्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. त्या विक्रमाबद्दल आज या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
३ षटकात ठोकले शतक
खरंतर तो विक्रम केला होता, ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन (Sir Donald Bradman) यांनी. तो विक्रम असा होता, की केवळ ३ षटकांमध्येच ब्रॅडमन यांनी शतकी खेळी केली होती. हा विक्रम त्यांनी १९३१ साली ब्लॅकहीथ इलेव्हन संघाकडून खेळताना केला होता.
ब्रॅडमन यांनी लिथगो या संघाविरुद्ध तुफान फलंदाजी केली होती. तसेच तब्बल २५६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये १४ षटकार आणि २९ चौकारांचा समावेश होता. खरंतर आयसीसीच्या क्रिकेट नियमानुसार एक षटकात ६ चेंडू टाकले जातात. परंतु क्रिकेटच्या सुरुवातीला एका षटकात ८ चेंडू टाकले जात होते. त्यास अष्टक असे म्हटले जात होते. अशामध्ये ब्रॅडमन यांनी २४ चेंडूत शतक ठोकण्याचा कारनामा करून दाखविला होता. त्यांनी पहिल्या षटकात ३३ धावा, दुसऱ्या षटकात ४० धावा आणि तिसऱ्या षटकात २७ धावा करत आपले शतक पूर्ण केले होते.

कसोटीत ब्रॅडमन यांच्या नावावर आहे सर्वाधिक द्विशतके ठोकण्याचा विक्रम
ब्रॅडमन यांनी कसोटीत एकूण १२ द्विशतके ठोकण्याचा कारनामा आपल्या नावावर केला आहे. ते जेव्हा २२ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी कसोटी सामन्यात एका दिवसात ३३४ धावा ठोकल्या होत्या. तो विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. ब्रॅडमन यांनी १९२८ साली ब्रिसबेन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. ब्रॅडमन हे जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विक्रम असणारे फलंदाज आहेत. त्यांची कसोटी क्रिकेटमध्ये असणारी ९९.९४ सरासरी ही नक्कीच आश्चर्यचकित करणारी आहे. त्यांनी २००१ साली या जगाचा निरोप घेतला होता. त्यांना भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पाहून म्हटले होते, “तो जेव्हा फलंदाजी करतो, तेव्हा त्याच्या फलंदाजीत मला माझी झलक दिसते.”
१२ वर्षांच्या वयात ठोकले होते शतक
ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक १२ वर्षांच्या वयामध्ये ठोकले होते. त्यावेळी ब्रॅडमन बॉवरल विद्यालयात शिक्षण घेत होते. १९२०-२१ दरम्यान या दिग्गज खेळाडूने मित्तागाँग विद्यालयाविरुद्ध ११५ धावांची नाबाद शतकी खेळी केली होती.






