भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने घरगुती क्रिकेटसोबतच भारतीय संघाच्या भविष्यातील वेळापत्रकाची तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचे यजमानपद सांभाळणार आहे, तर एप्रिल महिन्यात आयपीएलचा १४ वा हंगाम खेळला जाईल, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांना पत्र लिहित याची माहिती दिली आहे.
गांगुलीने लिहिले की, “भारतीय संघ यावर्षी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा दौरा करेल. यानंतर भारतीय संघ २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचे यजमानपद सांभाळणार आहे. या मालिकेनंतर एप्रिल महिन्यात आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू होईल. २०२१ मध्ये भारतीय क्रिकेटचे वातावरण व्यस्त असणार आहे. कारण भारतात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांमध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन होईल आणि भारतीय संघाला कोरोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी अनेक देशांसोबत मालिकाही खेळावी लागू शकते.”
कोरोनामुळे इंग्लंडने यावर्षीचा दौरा केला रद्द
कोरोना व्हायरसमुळे इंग्लंड संघाने यावर्षी सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात होणारा भारतीय संघाचा दौरा रद्द केला होता. दोन्ही संघांमध्ये सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये ३ वनडे आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली जाणार होती. आता हीच मालिका २०२१ च्या सुरुवातीला होणार आहे. इंग्लंड संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहे. वनडे व्यतिरिक्त या दौऱ्यात इंग्लंड कसोटी चॅम्पियनशीपअंतर्गत भारताविरुद्ध ५ सामन्यांची मालिका खेळणार आहे. तरीही, आता याचे वेळापत्रक निश्चित केलेले नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ डिसेंबरपासून होणार पहिला कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना ब्रिसबेन येथे खेळला जाईल. भारतीय संघ परदेशात आपला पहिला दिवस- रात्र कसोटी सामना ११ डिसेंबरपासून ऍडेलेड येथे खेळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतीय संघाच्या खेळाडूंना दौऱ्यावर १४ दिवसांसाठी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवावे लागेल. त्यासाठी भारतीय संघ नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.
सुरक्षित वातावरणातच घरगुती क्रिकेटचा हंगाम होईल सुरू- सौरव गांगुली
गांगुलीने पुढे बोलताना म्हटले की, “बीसीसीआयला अपेक्षा होती की काही महिन्यांमध्ये कोविड-१९ च्या स्थितीत सुधारणा होईल आणि घरगुती क्रिकेट सुरक्षित वातावरणात सुरू होईल. बीसीसीआयसाठी आवश्यक आहे की, घरगुती क्रिकेटमध्ये सामील खेळाडू आणि सर्व भागधारकांच्या आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेतली जाईल आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत.”
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेने होणार घरगुती हंगामाला सुरुवात
भारतात घरगुती क्रिकेटची सुरुवात ऑगस्टपासून होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे यावेळी क्रिकेट हंगाम सुरू होऊ शकला नाही. आता घरगुती हंगाम सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेने सुरू होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयने धोनीच्या निवृत्तीबाबत योग्य व्यवहार केला नाही; पाकिस्तानचा माजी खेळाडू कडाडला
-जेव्हा सीएसकेने आरसीबीला पराभूत करत जिंकले होते सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद…
-बीसीसीआयने धोनीला असा काही झटका दिला की त्याला निवृत्तीचाच घ्यावा लागला निर्णय
ट्रेंडिंग लेख-
-आकडे सांगतात : विदेशात आयपीएलमध्ये खेळताना चालत नाही विराट कोहलीची बॅट
-ऍशेस विजयासह २३ ऑगस्ट रोजी क्रिकेट विश्वात काय काय खास घडलं?