३१ ऑक्टोबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक वाईट दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसामागे एका भयान घटनेची पार्श्वभूमी आहे. १९८४ मध्ये ३१ ऑक्टोबर या दिवशी, भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांचेच अंगरक्षक असलेल्या सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी गोळ्या झाडून निर्घुण हत्या केली होती. त्या एका घटनेने संपूर्ण देशात स्मशानशांतता पसरली होती आणि त्या शांततेचे रूपांतर दंगलीत झाले होते.
इंदिराजींच्या हत्येवेळी सुनील गावसकर यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौर्यावर होता. हत्येची बातमी मिळताच, दुसरा एकदिवसीय सामना अर्धवट सोडून देण्यात आला, तर उरलेला एक एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळवलाच गेला नाही.
अनेकांना प्रश्न पडेल की, एक कसोटी आणि एकदिवसीय सामना कसा रद्द झाला ? तर, त्यावेळी कसोटी सामन्यांच्या दरम्यान एकदिवसीय सामने खेळवले जात असत. अशाप्रकारे मालिकेची सुरुवात पहिल्या वनडेपासून होऊन, त्यानंतर दोन कसोटी सामने खेळवले गेले होते. दौरा रद्द करण्यात आला तो दुसरा एकदिवसीय सामना होता.
तत्पूर्वी, या दौर्याची सुरुवात १२ ऑक्टोबरला क्वेटा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याने झाली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली आणि कर्णधार झहीर अब्बास यांच्या ५५ धावांच्या जोरावर ४० षटकांत ७ बाद १९९ धावा केल्या.
नावेद अंजुम आणि मंजूर इलाही यांनीही महत्त्वपूर्ण ३०-३० धावांच्या खेळ्या केल्या होत्या. भारतासाठी कपिल देव यांनी ३६ धावांत ३ बळी मिळवले.
प्रत्युत्तरादाखल, भारत १५३ धावांवर सर्वबाद झाला. सलामीवीर सुरिंदर खन्ना एकटेच तिशी पार करू शकले. पाकिस्तानकडून ताहिर नक्श, मंजूर इलाही आणि नावेद अंजुम यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
१७-२२ ऑक्टोबर दरम्यान लाहोर येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि कर्णधार जहीर अब्बास यांनी नाबाद १६८ धावांची खेळी केली. यजमानांनी ९ बाद ४२८ धावांवर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल भारताचा डाव ९४-१ वरून सर्वबाद १५६ असा गडगडला. अजीम हाफिज यांनी ४६ धावांत ६ गडी गारद करत पाकिस्तानच्या गोलंदाजीची नेतृत्व केले. भारतातर्फे सुनील गावसकर यांनी सर्वाधिक ४८ धावा काढल्या.
भारताचा फॉलोऑन देण्यात आला, परंतु मोहिंदर अमरनाथ यांच्या नाबाद १०१ तसेच, रवी शास्त्री आणि अंशुमन गायकवाड यांच्या अर्धशतकांसह भारताने कसोटी अनिर्णित राखली. सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानी पंचांवर जोरदार टीका केली होती.
२४-२९ ऑक्टोबर दरम्यान फैसलाबाद येथे खेळलेली दुसरी कसोटी ही चुरशीची ठरली. संदीप पाटील व रवी शास्त्री या मुंबईकरांच्या शतकी खेळ्यांमुळे भारताने पहिल्या डावात ५०० धावांचा डोंगर रचला.
प्रत्युत्तरात, पाकिस्तानने भारतीय फलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली. कासिम उमर यांनी २१० धावांची लाजवाब खेळी केली. मुदस्सर नझर यांना दुर्देवीरित्या एका धावाने आपले द्विशतक पूर्ण करता आले नाही. युवा सलीम मलिक यांनी नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. यजमानांनी ६ बाद ६७४ असेच चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, तो सामना देखील अनिर्णित राहिला. या दौर्याचा हा पूर्ण झालेला तो अखेरचा सामना होता. त्यानंतर इंदिराजींच्या हत्येमुळे सियालकोट वनडे सामना भारताला अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागले.
इंदिराजींच्या हत्येदिवशी, भारत-पाकिस्तान दरम्यान, मालिकेचा दुसरा एकदिवसीय सामना सियालकोट येथे खेळला जात होता.
४० षटकांच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २१० धावा फलकावर लावल्या होत्या. दिलीप वेंगसरकर यांनी १०२ चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. वेंगसरकर यांचे मुंबईकर साथीदार संदीप पाटील यांनी ८३ चेंडूत ५९ धावांचे योगदान दिले होते.
भारताचा डाव संपल्यानंतर, इंदिराजींच्या हत्येची दुर्दैवी बातमी संघाला दिली गेली. त्यामुळे, चालू सामना तसेच उर्वरित दौरा तात्काळ रद्द करत भारतीय संघाला मायदेशी रवाना करण्यात आले.