मुंबई । कोरोना महामारीच्या सावटात साउथॅप्टन येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला गेला. या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला आहे. चेंडूला लाळ लावू न शकल्याने इंग्लंडचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांची स्विंग गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पराभव झाला असल्याचे मत भारताचे माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि आशिष नेहरा यांनी व्यक्त केले.
इरफान पठाण म्हणाला की, “इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना जैविक वातावरणात खेळवण्यात आला. आता जगातील सर्वच वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग विसरून जावे लागणार आहे.”
“जिम्मी अँडरसन हा शॉर्ट ऑफ लेंथ वर गोलंदाजी करत होता. चेंडूला लाळ लावू न शकल्याने तो स्विंग करू शकला नाही,” असे मत माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने व्यक्त केले.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयसीसीने क्रिकेटसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. या नव्या नियमानुसार कोणत्याही गोलंदाजास चेंडूस चमक आणण्यासाठी लाळ लावता येणार नाही.
आशिष नेहरा पीटीआयशी बोलताना म्हणाला, “अँडरसनने अनेकदा शॉर्ट ऑफ लेंथवर चेंडू टाकले. पूर्वी अशी गोलंदाजी करताना कधी पाहिले नाही. डय़ूक चेंडू स्विंग होत नव्हता. कारण त्याला लाळ लावले नसल्याने त्याला चमक येत नव्हती. आपल्या क्षमतेनुसार तो प्रदर्शन करू शकला नाही.”
मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर यांनी पाचव्या दिवशी केलेली गोलंदाजी पाहून पठाण म्हणाला की, “काही दिवसांसाठी गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग विसरून जावे लागणार आहे. लाळ लावल्यानेच चेंडू रिव्हर्स स्विंग होतो. चेंडूला लाळ लावू दिले नसल्याने वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करणे अवघड जात आहे.”
“चेंडूला इतर कृत्रिम पदार्थ लावण्याची परवानगी द्यावी. अन्यथा रिव्हर्स स्विंग विसरून जावे लागेल. वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनवावी लागेल. अन्यथा सामना एकतर्फी होऊन जाईल,” असे इरफान पठाणने सांगितले.