---Advertisement---

बार्सिलोनाच्या वाघाची होतेय शेळी!

On: सोमवार, ऑगस्ट 17, 2020 11:38 AM
---Advertisement---

चॅम्पियन्स लीगच्या मागील काही वर्षातील उपांत्य आणि अंतिम फेरीतील संघ पाहिले तर कदाचित बार्सिलोना संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचा दावेदार होता हे कोणाला पटणार सुद्धा नाही. पण मेस्सी, इनिएस्टा, नेमार, सुवारेझ, टेर स्टेगन, पीके या दिग्गज खेळाडूंची भरणा असलेल्या संघाला तरी सुद्धा मागील ५ वर्षात विजेतेपद तर सोडा अंतिम फेरीत सुद्धा प्रवेश मिळवता आला नाही. फक्त एवढेच नव्हे तर मागील ३ हंगामात तर मेस्सीच्या बार्सिलोनाला लज्जास्पद पराभव पहावा लागला आहे.

चॅम्पियन्स लीगमध्ये आपल्या घरच्या मैदानावर मागील ३६ सामन्यात अपराजित असताना सुद्धा बार्सिलोनाला का अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नाही याची कारणमीमांसा करण्याचा हा एक प्रयत्न.

१. घरच्या मैदानावरील शेर बाहेर मात्र ठेर
पहिल्या फेरीपासून तर संघ मजल मारल त्या फेरी पर्यंत बार्सिलोना संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम मागील ३६ सामन्यात कोणत्याच संघाला जमला नाही पण जेव्हा हाच संघ विरोधी संघाच्या मैदानावर जातो तेव्हा हे तेच खेळाडू आहेत का जे घरच्या मैदानावर खेळले होते हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. बार्सिलोनाच्या आक्रमणाची धुरा अनेक वर्ष सांभाळत आलेल्या सुवारेझला सप्टेंबर २०१५ नंतर काल पहिल्यांदा कॅम्प नाऊ (बार्सिलोनाचे मैदान) च्या बाहेर गोल मारण्यात यश आले यातच अनेक गोष्टी उघड होतात.

२. मेस्सी नसला तर होतात वांदे
चॅम्पियन्स लीगमध्ये मागील १३ सामन्यात २० गोल करणाऱ्या मेस्सीवरच पूर्ण संघ अवलंबून असतो. २०१६-१७ नंतर बार्सिलोना संघासाठी गोल्स करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर हे चित्र अजूनच स्पष्ट होते.
मेस्सी :- ३१
ओन गोल :- ९
सुवारेझ :- ८
नेमार आणि डेंबेले :- ४
११ खेळाडूंच्या संघात जर १ च खेळाडू गोल करत असेल तर विरोधी संघाला त्याच खेळाडूला थांबवून विजय मिळवण्यात लवकर यश मिळते आणि असेच काही बार्सिलोना संघाबद्दल होत आहे.

३. डिफेन्स मधील कमतरता आणि खेळाडूंचे सिलेक्शन
एकेकाळी डिफेन्स मध्ये पुयोल, पीके, डॅनी ॲल्वेस, अल्बा असलेल्या बार्सिलोनाला मागील काही वर्षात डिफेन्स मध्ये पीकेला साथ देणारा खेळाडू शोधण्यात अपयश आले आहे. उमतीती संघात स्थान मिळवत आहे असे दिसत असतानाच तो दुखापतग्रस्त झाला आणि अजून सुद्धा त्यातून पूर्णपणे बाहेर येऊ शकला नाही. परवाच त्याला कोरोना झाल्याचे समजले. लेंगलेट सुद्धा अजून पाहिजे तसा संघात रुळला नाही आणि सेमेडो, अल्बा साठी बार्सिलोना अजून पण पर्याय शोधू शकली नाही. टेर स्टेगन मेस्सी नंतरचा बार्सिलोनाचा सर्वात सातत्य राखलेला खेळाडू आहे पण त्याला पाहिजे तशी साथ डिफेन्समध्ये मिळाली नाही हे सुद्धा सततच्या पराभवाचे कारण आहे.

४. मिडफिल्ड मधील सततचे बदल
झ्यावी, इनिएस्टा, बुस्केट्स यांनी एक दशक गाजवल्यानंतर आता बार्सिलोनाला यांचा पर्यायी खेळाडू मिळाला नाही हे एक चिंतेचे कारण आहे. कॉटिन्हो, आर्थुर, डेंबेले, विदाल, राफिन्हा, डी जॉंग, राकिटिक, सॅंपर, डेनिस सुवारेझ, आंद्रे गोमेझ, अर्दा तुरान एवढे खेळाडू मागील ३ वर्षात बार्सिलोनाने मधल्या फळीत खेळवून पाहिले आहेत.
अनेक खेळाडू अव्वाच्या सव्वा किमतीला घेऊन त्यांना अर्ध्या पेक्षा कमी किमतीत विकायची वेळ किंवा त्यांना लोनवर दुसऱ्या संघाला देण्याची वेळ वारंवार बार्सिलोना संघावर येते आहे. याचा फटका संघातील इतर खेळाडूंच्या खेळावर दिसून येतो यातच संघाच्या बोर्डचे सुद्धा अपयश दिसून येते. त्यामुळेच संघाला मोक्याच्या क्षणी अंतिम ११ खेळाडू निवडताना अनेक अडथळे येतात.

५. संघाचे फॉर्मेशन
इतर वेळी ४-३-३ या फॉर्मेशनने खेळणारा बार्सिलोना संघ मोक्याच्या क्षणी ४-४-२ अश्या फॉर्मेशनने मैदानावर उतरतो आणि सामना हरतो. मागील ३ वर्षात रोमा, लिव्हरपूल आणि बायर्न विरुद्ध बार्सिलोना संघ ४-४-२ या फॉर्मेशनने उतरला आहे तर इतर वेळी हाच संघ ४-३-३ ने मैदानात उतरतो. अचानक झालेल्या या फॉर्मेशन मधील बदलामुळे सुद्धा खेळाडूंच्या खेळावर परिणाम होतो. संघाचे प्रशिक्षक बदलत गेले तरी मोक्याच्या क्षणी झालेल्या या फॉर्मेशन बदलामागे नक्की प्रशिक्षक आहे का बोर्ड हा सुद्धा प्रश्न समोर येतो.

जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या खेळाडूंमधील एक मेस्सी संघात असताना सुद्धा जर संघ विजेतेपद तर सोडा अंतिम फेरीत सुद्धा प्रवेश मिळवू शकत नसेल तर संघाला नवीन विचारसरणी आणि बदलांची गरज आहे नाही तर बार्सिलोना संघाची अवस्था सुद्धा सद्ध्या असलेल्या मिलन संघासारखी होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---