भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून क्वारंटाईनमध्ये आहे. पण रोहित शर्मा आणि इशांत शर्मा सध्या ऑस्ट्रेलियात असलेल्या खेळाडूंबरोबर नाहीत. ते आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरत असून बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहेत. पण त्यांचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश आहे. मात्र, आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी त्यांच्या कसोटी मालिकेतील सहभागाबद्दल संशय व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये १४ दिवसांसाठी बाहेरुन आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे जर लवकरात लवकर इशांत आणि रोहित ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले नाहीत तर त्यांना ६ ते ८ डिसेंबरदरम्यान सराव सामन्यात सहभागी होणे शक्य होणार नाही. त्यानंतर १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
एबीसी स्पोर्ट्सशी बोलताना शास्त्री म्हणाले, ‘रोहित मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार नाही हे आधीच निश्चित झाले होते. तो सध्या एनसीएमध्ये काही चाचण्यांना सामोरा जाईल. ते तिथे ठरवतील त्याला किती काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. कारण आता तुम्ही अधिक काळ पण विश्रांती घेऊ शकत नाही.’
तसेच शास्त्री म्हणाले, रोहितला खुप काळ विश्रांती घ्यावी लागली तर गोष्टी अधिक कठीण होतील. कारण क्वारंटाईनचा कालावधी देखील आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे.
शास्त्री म्हणाले, ‘जर त्याला कसोटी मालिका खेळायची असेल तर येत्या ३-४ दिवसात त्यांना विमानात बसावे लागेल. जर असे झाले नाही तर सर्व कठिण होईल.’
त्याचबरोबर इशांतबाबत शास्त्री म्हणाले, ‘इशांतची गोष्टही रोहित प्रमाणेच आहे. आपल्याला खरंच माहित नाही की ते ऑस्ट्रेलियाला येण्यासाठी कधी तयार होणार आहेत. जसे मी म्हटले की कसोटी खेळायची असेल तर त्याला येत्या चार-पाच दिवसात इकडे यावे लागेल. नाहीतर गोष्टी अवघड होतील.’
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर ४ ते ८ डिसेंबरदरम्यान ३ सामन्यांची टी२० मालिका होईल. यानंतर कसोटी मालिका होणार आहे. कसोटी मालिकेआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध २ सराव सामने खेळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘टीम इंडिया’ जिममध्ये गाळतेय घाम; पंड्याने दाखवली ‘मसल्स पॉवर’, Video जोरदार व्हायरल
स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेला श्रीसंत लवकरच करणार पुनरागमन; ‘या’ स्पर्धेत घेणार भाग