आयपीएल २०२०मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड सुरुवातीला संघर्ष करताना दिसला. त्यानंतर त्याने आपला खेळ सुधारत चमकदार कामगिरी करायला सुरुवात केली. त्याने चेन्नईसाठी सलग अर्धशतक ठोकत विजय मिळवून दिला. यानंतर आता त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे, परंतु ऋतुराज गुरुवारी (२९ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करणार असल्याची भविष्यवाणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आधीच केली होती.
ऋतुराज करेल मोठ्या खेळीची सुरुवात
“मला वाटत आहे की आजच्या (२९ ऑक्टोबर चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना) सामन्यात ऋतुराज पुन्हा एकदा मोठ्या खेळीची सुरुवात करेल. कारण त्याची टेक्निक आणि मानसिकता कमालीची आहे. धोनी त्याच्यावर नक्कीच विश्वास ठेवेल,” असे चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यापूर्वी आपल्या यूट्यूब व्हिडिओत सचिनने म्हटले होते.
७२ धावांची धमाकेदार खेळी
खरं तर दुबईत गुरुवारी (२९ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने चेन्नईसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईकडून ऋतुराजने ५३ चेंडूत ७२ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. यामध्ये २ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईने १७८ धावा करत सामना जिंकला.
ऋतुराज मोठी खेळी करण्यासाठी बनला आहे- सचिन तेंडुलकर
या सामन्यापूर्वी आपल्या यूट्यूबवरील एका व्हिडिओत सचिन तेंडुलकरने म्हटले होते की, “मी त्याला जास्त खेळताना पाहिले नाही. परंतु मी जे पाहिले आहे, ते म्हणजे ऋतुराज एक शानदार फलंदाज आहे.”
या व्हिडिओत सचिनने पुढे म्हटले होते की, “ऋतुराजने बेंगलोरविरुद्ध चांगली फटकेबाजी केली. तसेच, आपल्या खेळात सुधारणा केली आहे. जेव्हा कोणताही फलंदाज योग्य फटकेबाजी करायला सुरुवात करतो, चेंडूला कव्हर किंवा मिड-विकेटच्या वरून मारतो, किंवा गोलंदाजाच्या डोक्यावरून मारतो, तेव्हा हे समजले जाते की तो फलंदाज मोठी खेळी करण्यासाठीच बनला आहे.”