१५ ऑगस्ट हा भारतीयांसाठी मोठा उत्सव आहे. या दिवशी भारताने १५० पेक्षा जास्त वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले. यासाठी असंख्य बलिदान दिले गेले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर हा दिवस दरवर्षी भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी देशाच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. भारतीय क्रिकेट बद्दल बोलायचे झाले तर स्वातंत्र्यानंतर भारताने १५ ऑगस्ट या दिनी अवघे तीन कसोटी सामने खेळले आहेत. आज, त्याच तीन सामन्यांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) इंग्लंड विरुद्ध भारत, १४-१८ ऑगस्ट १९५२
१९५२ चा इंग्लंड दौरा भारतीयांसाठी एका वाईट स्वप्नासारखा होता. पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करल्याने भारताने आधीच मालिका गमावली होती. १४-१८ ऑगस्ट दरम्यान झालेल्या ओव्हलवरील चौथ्या कसोटीत डेविड शेफर्ड यांच्या शतकाने व कर्णधार लेन हटन यांच्या ८६ धावांच्या मदतीने इंग्लंडने ३२६ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, भारताची अवस्था ४९-५ अशी असताना पाऊस सुरु झाला. त्यानंतर सलग अडीच दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला. पाचव्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर भारताचा डाव ९८ धावांवर संपला. पावसामुळे खेळ वाया गेल्याने सामना अनिर्णित राहिला.
२) भारत विरुद्ध श्रीलंका, १४-१७ ऑगस्ट २००१
२००१ श्रीलंका दौऱ्यावर १४-१७ ऑगस्ट दरम्यान झालेल्या गालेमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. श्रीलंकेच्या अतिशय मजबूत संघाने भारताला चारीमुंड्या चित केले होते. पहिल्या डावात युवा दिलहारा फर्नांडोने भारतीय फलंदाजीची वाताहात केली. फर्नांडोने पाच बळी घेत भारताचा डाव १८७ वर रोखला. कुमार संगकारा आणि सनथ जयसूर्या यांनी शतके ठोकत श्रीलंकेला ३६२ पर्यंत मजल मारून दिली. दुसर्या डावात पुन्हा एकदा भारतीय डावाची घसरण झाली. भारतीय संघाला केवळ १८० धावा करता आल्या. यजमान संघाने विजयासाठी मिळालेले ६ धावांचे लक्ष्य एकाच षटकात, चौथ्या दिवशी पूर्ण केले.
३) भारत विरुद्ध इंग्लंड, १५-१७ ऑगस्ट २०१४
स्वातंत्र्यदिनी सर्वात खराब प्रदर्शन भारताने २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यावर केले. ओव्हलच्या मैदानावर, मालिकेतील पाचव्या कसोटीच्या, पहिल्या डावात भारत १४८ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून एमएस धोनीने सर्वाधिक ८२ धावा केल्या. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात जो रूटच्या नाबाद १४९ धावांच्या बळावर ४८६ धावांचा डोंगर उभारला. ख्रिस जॉर्डनच्या ४ बळी मुळे भारताचा डाव अवघ्या ९४ धावात संपुष्टात आला. भारताने त्या सामन्यात, अवघ्या अडीच दिवसात, एक डाव व २४४ धावांनी पराभव स्वीकारला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार – एक स्कॉलर खेळाडू