---Advertisement---

खास व्हिडिओ शेअर करत विराटने दिली कॅप्टनकूल धोनीला मानवंदना

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 9:59 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने काल(१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने आज धोनीबद्दलचा एक व्हिडिओ शेअर करत त्याला मानवंदना दिली.

हा व्हिडिओ विराट आणि धोनी एकत्र फलंदाजी करतानाचा आहे. या व्हिडिओमधील सामन्यांबद्दल विराटने ट्विट करत संदर्भ दिला आहे. या व्हिडिओमध्ये पहिला सामना २०१४ च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील आहेत. तर दुसरा सामना २०१६ टी२० विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीतील आहे.

या व्हिडिओबद्दल विराटने ट्विट केले आहे की ‘या क्षणांसाठी धन्यवाद कर्णधार. आपल्यात असलेला परस्पर विश्वास, आदर आणि समजूतदारपणा मी या दोन पोस्ट केलेल्या व्हिडिओंपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजावू शकत नाही. पहिल्या व्हिडिओतून समजते की तो (धोनी) कोण आहे, कठिण प्रसंगीही तो निस्वार्थी होता.’

पहिला व्हिडिओ म्हणजे २०१४ च्या टी२० विश्वचषकातील सामन्याचा आहे. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला ७ चेंडूत १ धावेची गरज होती. तेव्हा धोनी स्ट्राईकवर होता. पण त्याने धाव काढली नाही. त्यामागे त्याचा विराटने विजयी धाव काढावी असा हेतू होता. त्यामुळे शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू अर्धशतकी खेळी केलेल्या विराटला खेळायला मिळाला आणि त्यानेही विजयी चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराटने त्या सामन्यात नाबाद ७२ धावा केल्या होत्या. त्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

तसेच या व्हिडिओतील २०१६ टी२० विश्वचषकाच्या सामन्याबद्दल विराटने पुढे म्हटले की ‘दुसरा, हा आम्ही एकत्र फलंदाजी करताना आमच्यात असणारा विश्वास आणि केमिस्ट्री दाखवणारा आहे. त्यावेळी मी केवळ त्याच्या धावांसाठी कॉल देण्याकडे लक्ष दिले होते आणि मला माहित होते आम्ही दोघेही २ धावा धावू शकतो कारण आम्हाला एकमेकांबद्दल तेवढा विश्वास आहे.’

‘त्याने कॉल दिला आणि मी खाली डोके घालून पळालो. परस्पर आदर आणि समजून घेणे ही काही लगेच होणारी साध्य होणारी गोष्ट नाही, जेव्हा दोन व्यक्ती एकत्र असतात तेव्हा त्या गोष्टी नैसर्गिकरित्या विकसित होतात. आमचा नेहमीच भारताला विजयी करण्याचा दृष्टीकोन राहिला आहे. कर्णधारा, या आठवणींसाठी धन्यवाद.’

२०१६ ला टी२० विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा मोहाली येथे सामना झाला होता. या सामन्यात विराट सामनावीर ठरला होता. त्याने ५१ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या होत्या.

भारताने या सामन्यात विजयासाठी १६१ धावांचा पाठलाग करताना पहिल्या तीन विकेट्स ८ षटकांच्या आतच ४९ धावांवर गमावल्या होत्या. पण नंतर विराटने चौथ्या विकेटसाठी युवराज सिंगबरोबर ४५ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला होता. पण युवराजही २१ धावा करुन बाद झाला होता.

त्यानंतर विराटने त्यावेळीचा भारताचा कर्णधार धोनीबरोबर नाबाद ६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला होता. यावेळी धोनी आणि विराटने बऱ्याच धावा पळून काढल्या होत्या.

या सामन्यात विराटने १९ व्या षटकात नॅथन कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर ४ चौकार मारत भारताला विजयाच्या समीप आणले होते. त्यानंतर २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. धोनीने या सामन्यात १० चेंडूत ३ चौकारांसह नाबाद १८ धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---