भारतीय क्रिकेट मधील एक जबदस्त अष्टपैलू खेळाडू म्हंणून सध्या हार्दिक पंड्याकडे पहिले जाते. अतिशय प्रतिभा असणाऱ्या ह्या खेळाडूने २०१६मध्ये वनडे व टी२० तर २०१७मध्ये श्रीलंका दौऱ्यात कसोटी पदार्पण केले. भारताकडून खेळणारा प्रत्येक खेळाडू एकदा तरी ही व्हाइट जर्सी परिधान करायला मिळावी यासाठी प्रयत्न करत असतो, कष्ट घेत असतो. ते हार्दिकचे स्वप्न २०१७मध्ये पुर्ण झाले.
हार्दिकने लंका दौऱ्यात फक्त कसोटी पदार्पणच नाही केले तर चांगली कामगिरी करून आपण लंबी रेस का घोडा असल्याचंही दाखवलं दिले होते. आज गेल्या ३ वर्षात दुखापतीमुळे तो जेमतेम ११ कसोटी सामने खेळू शकला आहे. परंतु अनेक भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे अतिशय कष्टाने हार्दिकने हे सर्व मिळवलं आहे. एकवेळ ४०० रुपयांसाठी संपूर्ण क्रिकेट स्पर्धा खेळणारा हार्दिक ते भारतीय क्रिकेट संघात तीनही प्रकारात चांगली कामगिरी करणारा हार्दिक हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
एक टी२० खेळाडू ते एक कसलेला कसोटीपटू हा प्रवास अगदी कालचा वाटत असला तरी त्यासाठी या मागे संपूर्ण पंड्या कुटुंबाने घेतलेलं कष्ट नक्कीच कालचे नाहीत. आजकाल हार्दिकची उच्च राहणी किंवा नवीन केशरचना या नक्कीच त्याचा इतिहास सांगणाऱ्या नसल्या तरी यापाठीमागे अनेक त्याग आहेत. सोशल मीडियावरील हार्दिक आणि प्रत्यक्ष हार्दिक यातील फरक हा बराच आहे.
इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला २०१६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिक म्हणतो, ” ५ रुपयांची मॅग्गी येत असे आणि तीच आम्ही भाऊ मैदानावर बनवून खात असे. नाश्ता, जेवण सगळं तेच असे. हा दिनक्रम अगदी ३६५ दिवस चाले. “
“आम्ही भाऊ दिवसभर मैदानात पडून रहायचो. बाहेर उधारी चिक्कार झाली होती. जेवढं मिळायचं ते लगेच संपून जायचं. १० रुपये सोडा ५ रुपयांचे पण वांधे होते. मी मोठ्या प्रमाणावर कर्जात बुडून गेलो होतो. मी जेवढे कमावायचो सगळे उधारी मिटवण्यात जायचे. “
पंड्या फॅमिलीचा त्याग:
हार्दिक पांड्याचे वडील हिमांशू यांचा कारचे लोन देण्यासाठीचा छोटा व्ययसाय सुरत शहरात सुरु होता. परंतु हार्दिक आणि कृणालसाठी त्यांनी तो बंद करून वडोदरा येथे स्थलांतरित झाले. जेथे त्यांनी दोघांनाही किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले.
कृणाल आणि हार्दिकने त्यांच्या प्रतिभेचा वापर हा कुटुंबाला मदत करण्यासाठी केला. जवळच्या खेडयात होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा हे खेळाडू अगदी ४००-५०० रुपयांसाठी खेळत.
” काही स्पर्धांना नावे नसत. या स्पर्धा आम्ही खेड्यात खेळत असे. मी काही स्पर्धा जांबूजा ११ सारख्या संघासाठी खेळलो आहे. मला ४०० तर भावाला ५०० रुपये मिळत असत. १ आठवडा तरी सगळं सुखात जायचं. ” हार्दिकने जानेवारी २०१६ ला क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना हार्दिक म्हणाला होता, ” इंडियन प्रीमियर लीग २०१५ पूर्वी मला कुणीही ओळखत नव्हतं. मला तेव्हा लिलावात १० लाख रुपये मिळाले. जर मला लोक ओळखत असते तर नक्कीच जास्त रुपये मिळाले असते. मी एका संघर्ष करणाऱ्या कुटुंबातून आलो आहे. त्याचमुळे आज मी इथे उभा आहे. ”
हार्दिकने भारताकडून ११ कसोटीत ५३२ धावा व १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे. वनडेत त्याने ५४ सामन्यात ९५७ धावा व ५४ विकेट्स घेतल्या आहेत. टी२०मध्ये ४० सामन्यात ३१० धावा व ३८ विकेट्स त्याने घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने ६६ सामन्यात १०६८ धावा व ४२ विकेट्स घेतल्या आहे.
हार्दिक प्रमाणेच हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्यानेही भारताकडून १८ टी२० सामन्यात ९ डावात फलंदाजी करताना ४ वेळा नाबाद रहात १२१ धावा व १४ विकेट्स घेतल्या आहे.